Advertisement

मुंबईत १ मे पासून लाॅकडाऊनची नवी गाइडलाइन? बीएमसीने केला खुलासा

राज्यातील लाॅकडाऊन वाढवण्यात आलं असून हे नवं लाॅकडाऊन १ मे पासून १५ मे पर्यंत कायम असणार आहे. या दरम्यान १ मे पासून नव्या गाइडलाइन्स लागू असतील, अशा आशयाचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईत १ मे पासून लाॅकडाऊनची नवी गाइडलाइन? बीएमसीने केला खुलासा
SHARES

राज्यातील लाॅकडाऊन वाढवण्यात आलं असून हे नवं लाॅकडाऊन १ मे पासून १५ मे पर्यंत कायम असणार आहे. या दरम्यान १ मे पासून नव्या गाइडलाइन्स लागू असतील, अशा आशयाचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर मुंबई महापालिकेचा लोगो वापरण्यात आलेला आहे. त्यावर मुंबई महापलिकेकडून तातडीने खुलासा करण्यात आला आहे.

समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेली ही माहिती खोटी असून बृ.म.न.पा.ने असे कुठलेही नियम जाहीर केलेले नाहीत. राज्य शासनाने यापूर्वी जाहीर केलेली मार्गदर्शक तत्त्वेच लागू आहेत, याची कृपया नोंद घ्यावी. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका व त्या पसरवूही नका, असा खुलासा मुंबई महापालिकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलच्या माध्यमातून केला आहे. सोबतच या फोटोवर FAKE असा शिक्का मारून तो फोटो महापालिकेने ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

या मेसेजमध्ये १ मे पासून नवी गाइडलाइन या मथळ्याखाली, गॅस एजन्सी दररोज सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार, स्टेशनरी शॉप मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार, औषध दुकाने सर्व दिवस २४ तास सुरू राहणार, किराणा दुकाने आणि दूध विक्री केंद्रे सर्व दिवस सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू राहणार, चपला आणि कपड्यांची दुकाने सोमवार आणि गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत खुली राहणार, जनरल स्टोअर्स मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार, घाऊक भाजी बाजार सर्व दिवस सकाळी ५ चे सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू राहणार, डॉमेस्टिक रिपेअर्ससाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ असेल, असं नमूद करण्यात आलं आहे. 

हेही वाचा- लोकं लाॅकडाऊनमध्येही घराबाहेर कशी? हायकोर्टाचा सरकारला सवाल

मात्र, राज्य सरकारने लाॅकडाऊन वाढवताना यापूर्वी जारी करण्यात आलेले निर्बंध १५ मे पर्यंत लागू करण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. महसूल व वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी  ‘ब्रेक द चेन’  अंतर्गत साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५  व यापूर्वीच्या आदेशान्वये हे आदेश जारी केले आहेत.

महाराष्ट्र राज्यात कोविड १९ विषाणूच्या संसर्गाचा प्रसार सातत्याने वाढत असल्याने कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाचा प्रसार परिणामकारकरित्या नियंत्रणात आणण्यासाठी योजलेल्या व कार्यान्वित केलेल्या आपत्कालीन उपाययोजना पुढे सुरु ठेवणे अपरिहार्य आहे. त्यामुळे साथरोग अधिनियम १८९७ मधील कलम २ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील संबंधित सर्व सहाय्यभूत तरतुदींन्वये बहाल केलेल्या अधिकारांचा उपयोग करून आपत्कालीन योजनांचे कार्यान्वयन आहे तसेच पुढे सुरु ठेवणे शासनास आवश्यक वाटत असल्याने फैलावाची साखळी परिणामकारक पद्धतीने तोडण्यासाठी सद्य निर्बंध व उपाययोजना यांची मुदत दिनांक १ मे २०२१ रोजीच्या सकाळी ०७ : ०० ते १५ मे २०२१ रोजीच्या सकाळी ०७ : ०० पर्यंत वाढविण्यात आले आहेत.

साथरोग अधिनियम १८९७ मधील कलम २ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील संबंधित सर्व सहाय्यभूत तरतुदींन्वये दिनांक १३ एप्रिल २०२१ व दिनांक २१ एप्रिल २०२१ रोजीच्या ब्रेक द चेन (साखळी तोडा) आदेशातील सर्व निर्बंध त्यामध्ये केलेल्या सुधारणा, दुरुस्त्या व स्पष्टीकरणाच्यासह संपूर्ण राज्यामध्ये दिनांक  १५ मे २०२१ रोजीच्या सकाळी ०७ : ०० पर्यंत वाढविण्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा