महापालिका अधिकाऱ्यांचे उठसूट परदेश दौरे बंद

 BMC
महापालिका अधिकाऱ्यांचे उठसूट परदेश दौरे बंद

मुबई - विकास कामांच्या नावांवर परदेश दौरा करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांनी चाप लावला आहे. विकासकामांच्या प्रकल्पाची तपासणी किंवा मालाची तपासणी करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी परदेश दौरे करत असतात. या सर्व अधिकाऱ्यांना आता परदेश दौरे करता येणार नसून अतिरिक्त आयुक्तांच्या मंजुरीनेच निविदा अटींमध्ये परदेश दौऱ्यांबाबत समावेश करावा लागणार आहे.

महापालिकेच्या अनेक मोठ्या प्रकल्प कांमाच्या निविदा प्रक्रियांमध्ये परदेशातील संस्था सहभागी होत असतात. या अनुषंगाने परदेशातील कंत्राटदारांच्या 'प्लान्ट', मशिनरीची किंवा संबंधित उत्पादन प्रत्यक्षात पाठविण्यापूर्वी त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी महापालिकेच्या अधिका-यांना परदेशात जावे लागू शकते. त्यामुळे यापूर्वीच्या बहुतांश मोठ्या निविदेच्या अटी आणि शर्तींमध्येच परदेश दौऱ्यासंबंधीच्या अटी आणि शर्तींचा समावेश असे. मात्र आता सुधारित परिपत्रकानुसार यासंबंधीच्या अटी आणि शर्तींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार निविदा विषयक अटी आणि शर्तींमध्ये परदेश दौऱ्याच्या अटीचा समावेश न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महापालिकेच्या विविध प्रकल्पांच्या निविदांमध्ये अनेकदा परदेशातील संस्था देखील सहभागी होत असतात. परदेशातील या संस्थांच्या प्रकल्पाची अथवा मालाची तपासणी करण्यासाठी महापालिका अधिका-यांना परदेशात पाठवण्यासंबंधीच्या अटींचा उल्लेख सरसकट सर्व निविदा प्रपत्रांमध्ये यापूर्वी करण्यात येत असे. मात्र आता याबाबत महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्या आदेशानुसार सुधारित आदेश नुकतेच लागू करण्यात आले आहेत. या सुधारित परिपत्रकानुसार येथून पुढे अत्यावश्यक असेल तेव्हाच संबंधित अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या मंजुरीने तपासणीच्या अटींचा समावेश निविदा प्रपत्रामध्ये करता येणार आहे.

Loading Comments