Advertisement

काळाघोडा चौकाला शिमोन पेरीज यांचं नाव देण्याचा प्रस्ताव बारगळला


काळाघोडा चौकाला शिमोन पेरीज यांचं नाव देण्याचा प्रस्ताव बारगळला
SHARES

फोर्ट येथील काळाघोडा चौकाला इस्त्रायलचे दिवंगत पंतप्रधान शिमोन पेरीज यांचं नाव देण्याचा प्रशासनाने आणलेला नियमबाह्य प्रस्ताव अखेर गटनेत्यांच्या बैठकीत राखून ठेवण्यात आला. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी भाजपा वगळता सर्वांनीच तीव्र विरोध करत गदारोळ घातला. त्यामुळे महापालिका आयुक्तांनीच हा प्रस्ताव तुर्तास राखून ठेवण्याची विनंती महापौरांना केल्यानंतर अखेर हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला.


आयुक्तांविरोधात तीव्र नाराजी

काळाघोडा येथील चौकाला पेरीज यांचं नाव द्यावं, अशी मागणी ‘फेडरेशन ऑफ इंडो इस्त्रायल चेंबर्स ऑफ कॉमर्स’ने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार आयुक्तांनी या नामकरणाचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मांडला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्त्रायलच्या दौऱ्यावर गेल्यानंतरच मुंबईतील या चौकाला पेरीज यांचं नाव देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी गटनेत्यांच्या सभेपुढे ठेवला होता. मात्र चौकाला नाव देण्यासाठी शिफारस करण्याचे अधिकार नगरसेवकांचे असून आयुक्तांनी नगरसेवकांचे अधिकारच डावलून स्वत: हा प्रस्ताव आणला होता. त्यामुळे आयुक्तांच्याविरोधात तीव्र नाराजी पसरली होती.


'हे योग्य नाही'

हा प्रस्ताव मांजुरीला आला असता मुंबईसह भारतात इस्त्रायली नागरिक राहत असून त्यामुळे हे नाव देणं चुकीचं नसल्याचा दावा भाजपाचे गटनेता मनोज कोटक यांनी केला. भारताच्याच काय मुंबईच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतीक आणि राजकीय क्षेत्रात शिमोन यांचे कोणतेही योगदान नाही. त्यामुळे हे नाव देणे योग्य नाही. हे नामकरण झाल्यास कायदा आणि सुवस्थेचा प्रश्नच निर्माण होईल, असा इशाराच सपाचे गटनेते रईस शेख यांनी दिला. 


म्हणून प्रस्ताव राखून ठेवला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी, एका बाजूला परदेशी व्यक्तींची नावे बदलून ती भारतीय व्यक्तींची देण्याचा प्रयत्न सुरू असताना, पुन्हा परदेशी व्यक्तीचं नाव देणं हे योग्य नसल्याचं सांगितलं. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार नाही तर ही महापालिका आहे. त्यामुळे याठिकाणी महापालिकेच्या नियमानुसारच कामकाज करायला हवं, असं सांगत याला तीव्र आक्षेप घेत चुकीच्या पद्धतीने हा प्रस्ताव आणणाऱ्या प्रशासनाचा निषेध केला. त्यामुळे महापालिका आयुक्तांची या प्रस्तावावर बोलण्याची इच्छा नसल्यामुळे अखेरीस महापौर विश्वनाथ महाडेश्वकर यांनी हा प्रस्ताव राखून ठेवला.


आता हे अशक्य

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे सध्या भारत भेटीवर आले आहेत. त्यांच्या बरोबरच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात आई-वडील गमावलेला मोशे होल्टझबर्ग हाही मुंबईत आला आहे. नेतान्याहू हे गुरुवारी मुंबईत येणार आहेत. त्यावेळी या चौकाच्या नामफलकाचे अनावरण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. पण हा प्रस्ताव राखून ठेवल्यामुळे शिमोन पेरीज यांचं नाव देणं शक्य होणार नाही.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा