Advertisement

मुंबईच्या नगरसेवकांना हवंय 50 हजार रुपये मानधन


मुंबईच्या नगरसेवकांना हवंय 50 हजार रुपये मानधन
SHARES

मुंबईतील नगरसेवकांना आजही मासिक 10 हजार एवढे मानधन दिले जात आहे. नगरसेवकांना 25 हजार रुपये मासिक मानधन देण्याचा ठराव करून राज्य सरकारकडे पाठपुरावा करून पाच वर्षे उलटली तरीही मानधन वाढवून मिळालेले नाही. परंतु आता पुन्हा एकदा नगरसेवकांकडून मानधन वाढवून देण्याची मागणी होत असून सपाचे गटनेते रईस शेख यांनीच महापालिका आयुक्तांना पत्र लिहून नगरसेवकांना 50 हजार मासिक मानधन देण्याची मागणी केली आहे.

मुंबई महापालिकेत 227 आणि पाच नामनिर्देशित सदस्या अशाप्रकारे एकूण 232 नगरसेवक असून त्यांना 2005च्या शासन निर्णयानुसार मासिक 10 हजार रुपयांचे मानधन मिळते. याशिवाय सभेच्या भत्यापोटी 150 रुपये एवढी रक्कम दिली जाते. वाढत्या महागाईमुळे नगरसेवकांना मिळणारी ही मानधनाची रक्कम तुटपुंजी असल्यामुळे महापालिका सभागृहात 31 जुलै 2012मध्ये ठराव करून नगरसेवकांना 25 हजार रुपये एवढे मानधन देण्याची मागणी केली होती. तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केलेल्या मागणीनुसार हा ठराव सभागृहात मंजूर केल्यानंतर तत्कालिन महापौर सुनील प्रभू यांनी 6 ऑगस्ट 2012ला तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे याबाबत पत्र पाठवले होते. परंतु आजतागायत नगरसेवकांच्या मानधनाबाबत निर्णय घेतला गेलेला नाही. काँग्रेसचे सरकार असल्यामुळे ते मानधन वाढवून देत नसल्याचा कांगावा तेव्हा सत्ताधारी पक्षाकडून केला जात होता. परंतु आता भाजपा-शिवसेनेचे सरकार येवून अडीच वर्षे उलटली तरी या मानधनवाढीबाबत कोणत्याही प्रकारचे परिपत्रक काढण्यात आलेले नाही. आठ महिन्यांपूर्वी सरकारने आमदारांचे मानधन वाढ 75 हजार रुपयांवरून दीड लाख रुपये करण्याचा आणि निवृत्ती वेतन 40 वरून 50 हजार रुपये करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली.

मात्र, आता सपाचे रईस शेख यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहून नगरसेवकांचे मानधन 50 हजार रुपये आणि भत्त्यापोटी 500 रुपये मिळावे अशी मागणी केली आहे. वाढती महागाई आणि नगरसेवकांच्या प्रभागांच्या वाढलेल्या सिमा आणि प्रभागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक झटत असतो. मात्र, त्याला उत्पादनाचे अन्य कोणतेही साधन नसल्यामुळे मानधनापोटी देण्यात येणारी रक्कम तुटपुंजी असल्याचे रईस शेख यांनी म्हटले आहे. त्यामुळे यापूर्वी केलेला ठराव आणि आता नव्याने केलेली मागणी याबाबत प्रशासनाने लक्ष केंद्रीत करून सरकारकडे पाठपुरावा करावा, यासाठी हे पत्र दिल्याचे शेख यांचे म्हणणे आहे.

दरम्यान महापालिका चिटणीस यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या नगरसेवकांना 10 हजार रुपये मानधन आणि 150 रुपये सभेचा भत्ता दिला जात असल्याचे सांगितले. महापालिकेतील ठरावानुसार 25 हजार रुपयांचे मानधनाबाबत सरकारकडे पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अद्याप त्यांच्याकडून कोणतेही परिपत्रक नसल्यामुळे अजुनही 10 हजार रुपये एवढेच मानधन दिले जात आहे. मात्र, रईस शेख यांचे पत्र अद्याप तरी आपल्या प्राप्त झालेले नसून प्रशासनाकडून काय अभिप्राय येतो तो पाहून त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे महापालिका चिटणीस नारायण पठाडे यांनी स्पष्ट केले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा