Advertisement

जगातील ६ सिस्टर सिटीजना मुंबई महापालिकेचं पत्र; लसींच्या पुरवठ्यासाठी केली मागणी

जागतिक स्तरावर लस मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

जगातील ६ सिस्टर सिटीजना मुंबई महापालिकेचं पत्र; लसींच्या पुरवठ्यासाठी केली मागणी
SHARES

कोरोना प्रतिबंधक लसींच्या (Coronavirus) तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या (bmc) ग्लोबल टेंडर मधून एका पुरवठादारानं माघार घेतली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर लस मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर जगातील ६ सिस्टर सिटीजने मुंबई महापालिकेला कोरोना लस पुरवावी, अशी मागणी केली आहे.

जगातील सेंट पिटर्सबर्ग, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, बुसान, स्टूटगार्ड आणि योकोहोमा या शहरातील महापौरांना मुंबई महापालिकेकडून पत्रं रवाना करण्यात आली आहेत. सध्याच्या कठीण काळात मुंबईला कोविडशी लढण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे. तसेच या शहरांनी यशस्वीपणे कोरोनावर (covid 19) नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे मुंबई शहराला मदतीचा हात द्यावा. तसेच उपलब्ध असतील त्या लसीचे १ कोटी ८० लाख डोस द्यावेत, असे मुंबई महापालिकेने पत्रात म्हटलं आहे. 

यापूर्वी वेगवेगळ्या कार्यक्रमांसंदर्भात मुंबईचे या ६ सिस्टर सिटीजसोबत संबंध आले आहेत. अनेकदा अधिकारी आणि महापौरांच्या भेटीगाठीही झाल्या आहेत. त्यामुळे या ६ सिस्टर सिटीजने मुंबईला लसीचा पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. तसेच या ६ शहरांनी लसीच्या डोसची किंमत कळवून पुढील व्यवहार ठरवावा, असेही पालिकेने या पत्रात नमूद केले आहे. या ६ शहरांपैकी जपानमधील योकोहोमा या शहरानं लस नाही. पण मुंबईसाठी आर्थिक मदत पाठवू, असे कळवले आहे. 

मुंबईत अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाला ब्रेक लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढलं होतं. या टेंडरद्वारे १ कोटी डोसची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणारी मुंबई ही देशातील पहिली महापालिका ठरली होती.

मुंबई महापालिकेच्या या प्रस्तावाला एकूण ८ पुरवठादार कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. मात्र मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरमधून एका पुरवठादाराने माघार घेतली आहे. यात एक कोटी डोस खरेदीसाठी ८ पुरवठादार आले होते यातील फायझर अस्ट्रॅझेनेकाची लस पुरवणाऱ्या कंपनीने माघार घेतली आहे.

पण ही माघार घेण्याचे नेमकं कारण काय? याचा कोणताही खुलासा कंपनीने केलेला नाही. तसेच कोणतेही कारण न देता फायझर अस्ट्रॅझेनेका कंपनीने ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून माघार घेतल्याने मुंबई महापालिकेला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान सध्या मुंबई महापालिका उर्वरित 7 पुरवठादारांबरोबर चर्चा करत आहे. कोरोनाची तिसरी लाट धडकण्याआधी प्रत्येक मुंबईकरांना ऑगस्ट अखेरपर्यंत लस मिळावी, असे पालिकेचे उद्दिष्ट आहे. पण इतर सात कंपन्यांनी अद्याप याबाबतची आवश्‍यक कागदपत्र सादर केलेली नाहीत.त्यामुळे पालिकेच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.



हेही वाचा -

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा