Advertisement

महापालिका रुग्णालयेही आता इस्कॉनच्या ताब्यात

शिवडी आणि कूपर रुग्णालयांमध्ये सुरूवातीला केवळ ११ महिन्यांकरीता जेवण पुरवण्याचं कंत्राट 'इस्काॅन'ला दिलं होतं. त्यानंतर निविदा मागवून या कंत्राटाचं वाटप करण्याऐवजी महापालिकेने ११ महिन्यांची मुदतवाढ देऊन 'इस्काॅन'ला पुन्हा झुकतं माप दिलं. स्थायी समितीने मंजूर केलेल्या मूळ प्रस्तावातील कंत्राटात फेरबदल करून ही मंजुरी दिली जात असल्यानं 'इस्काॅन'ला महापालिका फेव्हर करत असल्याचं स्पष्ट होत आहे.

महापालिका रुग्णालयेही आता इस्कॉनच्या ताब्यात
SHARES

महापालिका शाळांमधील मुलांना खिचडी पुरवण्याचं कंत्राट मिळवणाऱ्या इस्कॉन संस्थेने आता शिवडीतील क्षयरोग (टी.बी) रुग्णालयासह कूपर रुग्णालयातील रुग्णांनाही जेवण पुरवण्याचं कंत्राट मिळवलं आहे. या दोन्ही रुग्णालयांमध्ये सुरूवातीला केवळ ११ महिन्यांकरीता जेवण पुरवण्याचं कंत्राट 'इस्काॅन'ला दिलं होतं. त्यानंतर निविदा मागवून या कंत्राटाचं वाटप करण्याऐवजी महापालिकेने ११ महिन्यांची मुदतवाढ देऊन 'इस्काॅन'ला पुन्हा झुकतं माप दिलं. स्थायी समितीने मंजूर केलेल्या मूळ प्रस्तावातील कंत्राटात फेरबदल करून ही मंजुरी दिली जात असल्यानं 'इस्काॅन'ला महापालिका फेव्हर करत असल्याचं स्पष्ट होत आहे.


कंत्राट किती कालावधीसाठी?

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ रुस्तम नरसी कूपर रुग्णालयातील आंतररुग्णांना २ वेळचं जेवण, अल्पोपहार तसंच चहाची सेवा देण्याचं कंत्राट मे २०१४रोजी 'इस्काॅन रिलीप फाऊंडेशन'ला देण्यात आलं होतं. त्यानंतर वारंवार ११ महिन्यांकरता हे कंत्राट वाढवून देण्यात येतं आहे. संध्या सुरु असलेलं कंत्राट हे १ जून २०१७ ते ३० एप्रिल २०१८ या कालावधीतलं आहे. हे ११ महिन्यांचं कंत्राट ३० एप्रिल २०१८ला संपुष्टात येतं आहे.



किती रुपयांचं कंत्राट

या चालू कंत्राटात प्रतिदिन प्रतिरुग्ण ९४ रुपयांमध्ये आंतररुग्णांना जेवण, अल्पोपहार आणि चहाची सेवा दिली जात आहे. हे कंत्राट १ कोटी २८ लाख ११ हजार २६० रुपयांचं आहे. त्यामुळे कंत्राट संपत असताना मुदतवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढं मंजुरीला आला. स्थायी समितीच्या ठराव क्रमांक ७५३ नुसार आतापर्यंत मंजुरी मिळालेल्या २ कोटी २४ लाख ९४ हजार ३६६ रुपयांच्या कंत्राटात फेरफार करून हे कंत्राट ३ कोटी ५३ लाख ५ हजार ६२६ एवढं सुधारीत करण्यात आलं आहे.


नियम काय म्हणतो?

महापालकेकडून देण्यात येणारं कोणतंही काम स्पर्धात्मक निविदांद्वारे देण्यात यावं, असा नियम आहे. परंतु तसं न करता महापालिकेचे अधिकारी 'इस्काॅन'ला निविदा न काढता, स्थायी समितीने आधी मंजूर केलेल्या ठरावाच्या आधारे, त्यातील कंत्राट रकमेत फेरफार करत मंजूरी देत आहेत. हा प्रकार नियमबाह्य असून यापूर्वीच्या कंत्राटांवरही 'कॅग'ने ताशेरे ओढले आहेत.


टी.बी रुग्णालयातील किचनही बंद

शिवडीतील क्षयरोग रुग्णालयातील रुग्णांना सध्या 'इस्काॅन'कडून दोन्ही वेळचं जेवण, नाश्ता दिला जात आहे. 'इस्काॅन'ला हे कंत्राट दिल्यानंतर रुग्णालयातील किचन काढून तेथील कामगारांनाही इतर विभागांत हलवलं आहे. कूपर रुग्णालयाप्रमाणेच शिवडी रुग्णालयातही मूळ कंत्राटात फेरफार दाखवूनच ११ महिन्यांच्या कंत्राटाला मान्यता देत या संस्थेला कामे दिली जातात. शाळांमध्ये खिचडी पुरवण्याचं कंत्राट 'इस्काॅन'ला दिल्यानंतर आता या संस्थेला रुग्णालयांचंही कंत्राट दिलं जात आहे.



हेही वाचा-

शिवडीतील क्षयरोग रुग्णांना केवळ शाकाहारीच जेवण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा