Advertisement

शिवडीतील क्षयरोग रुग्णांना केवळ शाकाहारीच जेवण

शिवडीतील क्षयरोग रुग्णालयातील रुग्णांना जेवणामध्ये अंडी तसेच चिकन आणि मटण हे पोषक आहार तसेच प्रथिने देणारे पदार्थ देण्यात येत नाहीत. रुग्णांना या पदार्थांऐवजी केवळ शाकाहारी जेवण देण्यावरच भर दिला जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी कंत्राट मंजूर करताना चिकन आणि अंडी देण्याचे मान्य करूनही रूग्णांना हे पदार्थ दिले जात नाहीत.

शिवडीतील क्षयरोग रुग्णांना केवळ शाकाहारीच जेवण
SHARES

मुंबईत शाकाहार आणि मांसाहाराचा वाद चांगलाच रंगलेला असताना आता रुग्णांलयांमध्ये रुग्णांच्या जेवणातही हा वाद निर्माण केला जात आहे. शिवडीतील क्षयरोग रुग्णालयातील रुग्णांना जेवणामध्ये अंडी तसेच चिकन आणि मटण हे पोषक आहार तसेच प्रथिने देणारे पदार्थ देण्यात येत नाहीत. रुग्णांना या पदार्थांऐवजी केवळ शाकाहारी जेवण देण्यावरच भर दिला जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी कंत्राट मंजूर करताना चिकन आणि अंडी देण्याचे मान्य करूनही रूग्णांना हे पदार्थ दिले जात नाहीत.


११८ रूपयांचे नवे कंत्राट

क्षयरोग रुग्णालय तसेच बहादूरजी ब्लॉक येथील आंतररुग्णांना महापालिकेकडून जेवण पुरवण्यासाठी इस्कॉन संस्थेची निवड केली आहे. मागील वर्षी याच संस्थेला कंत्राट दिले होते. पंरतु, त्यावेळी ११० रुपयांमध्ये दोन्ही वेळचे जेवण पुरवणाऱ्या या संस्थेने आता हेच जेवण ११८ रुपयांमध्ये पुरवण्याचे कंत्राट भरले आहे. परंतु, दुपार व रात्र अशा दोन्ही वेळच्या जेवणांचा मेन्यू समान असून यामध्ये ४ चपाती, १ मोठी वाटी भात, २ वाटी डाळ, १ वाटी भाजी, १ वाटी सलाड, १ वाटी दही किंवा ताक आणि एक लिंबूचा तुकडा असेल असे त्यांनी आपल्या मेन्यूत नमूद केले आहे.


दोन्ही वेळच्या जेवणात शाकाहारीच पदार्थ!

मात्र, या दोन्ही वेळच्या जेवणात केवळ शाकाहारी पदार्थच असून अंडी तसेच चिकन आणि मटन अशा प्रकारचे मासांहारी पदार्थ नाहीत. त्यामुळे यावरून वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. केवळ इस्कॉन संस्था असल्यामुळेच हे मासांहारी पदार्थ दिले जात नसून यापूर्वी कंत्राट मंजूर करतानाही मासांहारी पदार्थ देण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु, या संस्थेने कोणतीही दखल न घेता शाकाहारीच जेवण रुग्णांना उपलब्ध करून दिले.


शिवडीत येतात राज्यभरातले रूग्ण

शिवडी रुग्णालयात सरासरी ८० ते ८५ टक्के क्षयरुग्ण उपचारांसाठी दाखल होत असतात. क्षयरोग रुग्णालयात दररोज सरासरी १५० ते २०० रुग्ण बाह्य रुग्ण विभागात तपासले जातात आणि ४० ते ५० रुग्ण भरती केले जातात. एकूण १२०० खाटांचे हे रुग्णालय असून मुंबईसह महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात क्षयरोगाचे रुग्ण इथे दाखल होत असतात.


स्थायी समितीत नामंजूर होऊ शकतो प्रस्ताव

दरम्यान, ११८ रूपयांच्या कंत्राटाचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी आलेला असताना नॉनव्हेज जेवणाच्या मुद्द्यावर हा प्रस्ताव नामंजूरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता स्थायी समिती यावर काय निर्णय घेते, त्यावर इस्कॉनच्या कंत्राटाचं भवितव्य अवलंबून असेल.



हेही वाचा

शिवडी रुग्णालयात पहिल्यांदाच झाली टीबीसाठीची थोरॅकोस्कोपिक सर्जरी


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा