Advertisement

BMC Market पालिकेच्या मंडया सम-विषम पद्धतीने सुरू करण्यास परवानगी

मंडयांमधील दोन्ही बाजूस असलेली दुकाने सम-विषम तारखेस आळीपाळीने सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

BMC Market पालिकेच्या मंडया सम-विषम पद्धतीने  सुरू करण्यास परवानगी
SHARES

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील मंडया सुरू करण्यास पालिकेने आता हिरवा कंदील दाखवलेला आहे. मुंबईत जीवनावश्यक वस्तुंची विक्री पूर्वीपासूनच सुरु असून त्यासोबत आता इतरही वस्तू, साहित्य विक्रीची दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मंडयांमधील दोन्ही बाजूस असलेली दुकाने सम-विषम तारखेस आळीपाळीने सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्रातील मंडया सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय हा संबंधित विभागांचे सहाय्यक आयुक्तांना देण्यात आलेला आहे.

हेही वाचाः- शरद पवार महाराष्ट्राला लागलेले कोरोना, गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुंबईतील पालिकेच्या संर्व मंडया मागील तीन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आल्या होत्या, मात्र परिस्थिती सुधारत असल्याचे पाहून मुंबई महापालिकेने पालिकेच्या हद्दीमध्‍ये बाजार विभागाच्‍या अखत्‍यारित ९२ किरकोळ मंडया, १६ खासगी मंडया व ९५ मंडया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ जून पासून मुंबई अनलाँकडाऊन करत, दुकाने सम-विषम तारखेनुसार सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र पालिकेकडून मंडया सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नव्हत्या. या आदेशाच्‍या अनुषंगाने विविध मंडयांतील व्‍यापारी संघटना व त्‍यांच्‍या प्रतिनिधींनी मंडयांतील इतर दुकाने सुरु करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला लेखी विनंती केली. कोविड १९ संसर्ग वाढू नये यासाठी शासनाच्‍या अटी व शर्तींचे पालन करुन मंडईतील दुकाने सुरु करण्‍यास या संघटनांनी सहमती दर्शवली आहे. मास्क-हॅण्ड ग्लोव्हज्‌, सॅनिटायझर यांची व्यवस्था करणे, प्रत्येक व्यक्तिचे शारीरिक तापमान तपासणे, सुरक्षित अंतर राखणे या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासह आवश्यकता भासल्यास मंडईमध्ये गर्दी नियंत्रणात करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात खासगी सुरक्षा रक्षक नेमणे आदी उपाययोजना करुन प्रशासनाला सहकार्य करण्यात येईल, असे या विविध संघटनांनी मान्य केले आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनानेही सकारात्मक पाऊल उचलून मंडया सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

हेही वाचाः- मनसेचा दणका, टी-सीरिजने काढलं आतिफ अस्लमचं गाणं

महानगरपालिकेच्‍या मंडयामधील काही दुकानांची रचना ही तळमजल्‍यावरील संकुलात्‍मक स्‍वरुपाची असून काही दुकाने समोरासमोर, तर बहुतांश मंडईत ३० ते ४० बंदीस्‍त दुकाने एकमेकांना लागून आहेत. मंडईमधील जीवनावश्‍यक वस्‍तुंची (Essential) विक्री करण्‍याकरीता यापूर्वी नियमानुसार परवानगी होती. आता जीवनावश्‍यक वस्‍तुंव्‍यतिरिक्‍त इतर वस्‍तुंची विक्री (Non-Essential) करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ज्याप्रमाणे रस्‍त्‍यांवरील दोन्ही बाजुंची दुकाने आळीपाळीने सुरु करण्यात आली आहेत, त्याच पद्धतीने महापालिकेच्‍या मंडईतील दोन्ही बाजूस असलेली दुकाने सम-विषम तारखेस आळीपाळीने सुरु राहतील. तसेच एका रांगेत असलेल्या मंडईत आळीपाळीने दुकाने सुरु ठेवण्यात येतील.  मंडईमधील सर्व दुकाने रविवारी बंद राहतील. तसेच मंडईतील दुकानातून एकदा घेतलील वस्तू पून्हा परत घेतली जाणार नाही. मंडया सुरु करण्यास परवानगी देण्यात येत असली तरी, सद्यस्थिती लक्षात घेता, महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये काही क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. अशा प्रतिबंधित क्षेत्रातील मंडयांबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार हे संबंधित विभागांच्या सहाय्यक आयुक्तांकडे सोपविण्यात आले आहेत.

० मंडईमध्ये उपहारगृह (हॉटेल/कॅन्टीन) इत्यादी बंद राहतील.

० दुकानांमध्ये काम करण्यासाठी फक्त २ व्यक्ती असतील.

० दुकानांमध्ये ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्ती यांना नेमता येणार नाही.

० कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापाऱयांनी प्रवेशद्वारावर नियमावली प्रदर्शित करणे आवश्यक असेल. ० दुकानदार/व्यापारी यांना आपापल्या भ्रमणध्वनीमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे आवश्यक असेल.

० मंडईतील कोणत्याही दुकानावर सुरक्षित अंतर राखण्याचे नियमांचे पालन होत नाही, असे आढळल्यास सदर दुकान तत्काळ बंद करण्यात येईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा