Advertisement

जुन्याच कचरा कंत्राटदारांना मुदतवाढ; महापालिकेवर नामुष्की

मुंबईमधील कचरा वाहून नेण्यासाठी आठ परिमंडळांमध्ये नियुक्त केलेल्या कंत्राटदारांची मुदत संपल्यानंतर पालिकेला वेळीच नव्या कंत्राटदारांची नियुक्ती करता आलेली नाही. त्यामुळे मूळ कंत्राटाला मुदतवाढ मिळाल्याने जुन्या कंत्राटदारांची चंगळ झाली आहे.

जुन्याच कचरा कंत्राटदारांना मुदतवाढ; महापालिकेवर नामुष्की
SHARES

 मुंबईतील कचरा वाहून नेत कचरा भराव भूमींमध्ये विल्हेवाट लावण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या जुन्या कंत्राटदारांची मुदत संपल्यामुळे नवीन कंत्राटदारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. परंतु नवीन कंत्राटदारांच्या कामांच्या प्रस्ताव मंजुरीला झालेल्या विलंबामुळे आता जुन्याच कंत्राटदारांना दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे. नवीन कंत्राटदारांचे दर कमी असूनही त्यांना काम सुरु करण्यास अजून काही अवधी जाणार असल्यानं सुमारे २०० कोटी रुपयांच्या कंत्राटाचं दान जुन्या कंत्राटदारांच्या झोळीत पडलं आहे.

१२३२ कोटींचं कंत्राट

मुंबईमधील कचरा वाहून नेण्यासाठी आठ परिमंडळांमध्ये नियुक्त केलेल्या कंत्राटदारांची मुदत संपल्यानंतर पालिकेला वेळीच नव्या कंत्राटदारांची नियुक्ती करता आलेली नाही. त्यामुळे मूळ कंत्राटाला मुदतवाढ मिळाल्याने जुन्या कंत्राटदारांची चंगळ झाली आहे. जुन्या कंत्राटदारांच्या सुमारे १०२०.४९ कोटी रुपयांच्या मूळ कंत्राटात करण्यात आलेली सुधारणा, पूर्वी आणि आता करण्यात येत असलेली फेरफार यामुळे हे कंत्राट तब्बल १२३२.२३ कोटी रुपयांच्या घरात पोहोचलं.


८ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबईमध्ये निर्माण होणारा कचरा उचलून तो कचराभूमीपर्यंत वाहून नेण्यासाठी पालिकेने ८ परिमंडळांमध्ये ८ कंत्राटदारांची नियुक्ती पाच वर्षांसाठी केली होती. या कालावधीत कचरा उचलण्याचं काम अव्याहतपणे सुरू रहावं यासाठी पालिकेने यापैकी काही कंत्राटांच्या रकमेत सुधारणा करीत कंत्राटदारांच्या झोळीत अतिरिक्त निधी टाकला. २०१७ मध्ये कंत्राट कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी पालिकेने निविदा प्रक्रिया राबवून नव्या कंत्राटदारांची नियुक्ती करणं अपेक्षित होतं. मात्र तसं न झाल्यामुळे जुन्हा कंत्राटदारांना मुदतवाढ देत मूळ कंत्राटाच्या रकमेत फेरफार करण्यात आली. 


७ प्रस्तावांना मंजुरी

ही मुदतही संपुष्टात आली असून पालिकेने पुन्हा एकदा मूळ कंत्राटांमध्ये फेरफार करीत जुन्या कंत्राटादारांना ऑक्टोबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही  ८ कंत्राटे तब्बल १२३२.२३ कोटी रुपयांवर पोहोचली आहेत. या वाढीव कामांच्या ८ पैकी ७ प्रस्तावांना बुधवारी स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी याला मंजुरी दिली. एन, एस आणि टी विभाग कार्यालयाच्या हद्दीतील कचरा उचलण्याचा प्रस्ताव राखून ठेवला.
 

कंत्राट अाणि कंत्राटदार

गट १ (ए, बी, सी, डी) १३८.६० कोटी, कंत्राटदार: वाय खान ट्रान्सपोर्ट
गट २ (ई, एफ-दक्षिण, जी-दक्षिण) १३०.३४ कोटी, कंत्राटदार:  एसकेआयपीएल - एमकेडी - डी आय (संयुक्त)
गट ३ (जी-उत्तर, एच-पश्चिम,) १९४.१७ कोटी, कंत्राटदार: बीसीडी (संयुक्त),
गट ४ (एल, एच-पूर्व, के-पूर्व) १४९.३९ कोटी, कंत्राटदार: डि.कॉन - डू इट (संयुक्त)
 गट ५ (के-पश्चिम, पी-दक्षिण, पी-उत्तर) १४२.०४ कोटी, कंत्राटदार:  आर एस जे (संयुक्त),
 गट ६ (आर-दक्षिण, आर-मध्य, आर-उत्तर) १६४.७६ कोटी, कंत्राटदार : पीडब्ल्यूजी (संयुक्त),
गट ७ (एफ-उत्तर, एम-पूर्व, एम-पश्चिम,) १७१.९२ कोटी, कंत्राटदार: एसटीसी - ईटीसी - एमएई (संयुक्त),
गट ८ (एन, एस, टी) ११७.१२ कोटी, कंत्राटदार: एमई - जीडब्ल्यूएम 



हेही वाचा - 

दहावी फेरपरीक्षेत मुंबईचा निकाल सर्वात कमी!

मुंबईतील २२३ गणेशोत्सव मंडळांचे अर्ज नाकारले!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा