Advertisement

निकृष्ट काम करणारी कंपनी काळ्या यादीत


निकृष्ट काम करणारी कंपनी काळ्या यादीत
SHARES

वांद्रयातील रस्त्यांची कामे ज्या कंत्राटदाराने निकृष्ठ दर्जाची केलेली आहेत, त्या संबंधीत कंत्राटदाराला महापालिकेच्यावतीने काळ्या यादीत टाकलं जात आहे. महापालिकेच्यावतीनं या कंपनीला काळ्या यादीत का टाकलं जावू नये, अशी नोटीस जारी करण्यात आली आहे. वांद्रयातील रस्त्यांचा कामांचा वाईट अनुभव लक्षात घेता या कंपनीला मिळालेलं परिमंडळ-तीन मधील खड्डे दुरुस्तीचं कंत्राटही रद्द करण्यात आलं आहे. यासंबंधीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मागे घेतला.


फरहान अख्तर यांची नाराजी

वांद्रे पश्चिम येथील सेंट अँड्यू रोडसह मेहबूत चौक येथील रस्त्यांचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं केल्याने चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता फरहान अख्तर यांनी ट्विटरच्या माध्यमातून महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर स्थानिक नगरसेवक काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांनीही स्थायी समितीत यावर आवाज उठवून कंत्राटदाराच्या कामाचा पाढाच वाचला. त्यानंतर रस्ते प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी आपण स्वत: या भागाची पाहणी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असं आश्वासन स्थायी समितीला दिलं होतं.


कंत्राटाचा प्रस्ताव मागे

या रस्त्यांचं काम करणाऱ्या मेसर्स मनदीप एंटरप्रायझेस या कंपनीलाच एच/पश्चिम व के/पश्चिम विभागातील अर्थात परिमंडळ ३ मधील विविध रस्त्यांचे पावसाळा पूर्वीची सुरक्षात्मक देखभाल व तातडीची कामे करण्याचे कंत्राट देण्यात आलं होतं. परंतू या कंपनीनं याच भागातील रस्त्यांची कामे करताना हवी तशी प्रगती न केल्यानं. निकृष्ट दर्जाचे काम करत असल्यामुळं, तसंच कामात नियोजनाचा अभाव आणि अपेक्षेप्रमाणे काम होत नसल्यानं या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात येत असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं. याबाबत कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आल्याचं सांगत अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी खड्डयांच्या कामांच्या कंत्राटाचा प्रस्ताव मागे घेतला.



हेही वाचा -

तांत्रिक बिघाडानं शहरातील बत्तीगुल

आता पिझ्झा मिळणार रेल्वे स्थानकात


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा