आणखी 12 मोकळ्या जागा महापालिका घेणार ताब्यात

  Mumbai
  आणखी 12 मोकळ्या जागा महापालिका घेणार ताब्यात
  मुंबई  -  

  मुंबईतील विविधा संस्थांच्या ताब्यात असलेल्या उद्यान आणि मैदानांच्या मोकळ्या जागा अखेर पुन्हा एकदा ताब्यात घेण्याची प्रक्रिया महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. सोमवारी उद्यान विभागाच्या वतीने 12 मोकळ्या जागांची देखभाल करणाऱ्या संस्थांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. यामध्ये माजी आमदार रमेश सिंह ठाकूर यांच्या संस्थेसह प्रजापिता बह्मकुमारी आणि अन्य संस्थांचा समावेश आहे.

  मुंबईतील 216 मनोरंजन मैदानं, खेळाची मैदानं ही दत्तक तत्वावर संस्थांना चालवण्यास देण्याचा प्रस्ताव सुधार समितीत मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला स्थगिती देऊन ही सर्व मैदानं महापालिकेने ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने टप्प्याटप्प्याने नोटीस बजावून ही मैदानं आणि उद्यानांची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यानुसार आतापर्यंत 216 पैकी 156 मैदानं आणि उद्यानांच्या जागा ताब्यात घेण्यात महापालिकेला यश आले आहे. मात्र, राजकीय पक्षांच्या नेत्यांसह अन्य संस्थांकडे असलेल्या मोकळ्या जागा ताब्यात घेण्यात चालढकल केली जात होती. याबाबत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आवाज उठवल्यानंतर या जागा अखेर ताब्यात घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

  महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने कांदिवली, परळ आदींसह अन्य भागांमधील 12 मैदानं आणि उद्यानांच्या जागा संस्थांकडून ताब्यात घेण्यासाठी नोटीस जारी केली आहे. त्यानुसार कांदिवलीमध्ये माजी आमदार रमेशसिंह ठाकूर यांच्या ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स या कॉलेजच्या ताब्यात ठाकूर व्हिलेजमध्ये असलेली दोन खेळांची मैदाने, तसेच त्यांच्याच झगडूसिंह चॅरिटेबल ट्रस्टच्या ताब्यातील दोन मैदानांसंदर्भात नोटीस जारी करण्यात आली आहे. याशिवाय एफ-दक्षिण विभागातील बह्मकुमारी प्रजापिता संस्थेच्या ताब्यातील दोन अशाप्रकारे एकूण 12 संस्थांकडील मोकळे भूखंड ताब्यात घेण्यात येणार आहेत. मात्र, या बारा मोकळ्या भूखंडांना नोटीस जारी करून हे भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी सर्वप्रथम नोटीस जारी केलेल्या आयटीसीकडील प्रतापराव घोगळे उद्यान ताब्यात घेण्याची कोणतीही कार्यवाही महापालिकेकडून केली जात नाही.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.