Advertisement

मुंबईत ऑमिक्रॉनच्या रुग्णांत वाढ; महापालिका यंत्रणा पुन्हा सज्ज

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

मुंबईत ऑमिक्रॉनच्या रुग्णांत वाढ; महापालिका यंत्रणा पुन्हा सज्ज
SHARES

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शिवाय, ओमायक्रॉनचा झालेला शिरकाव, या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली असून रुग्णसेवेसाठी पुन्हा तयारी सुरू केली आहे. सध्या मुंबईत १० मोठी कोरोना केंद्रे असून, त्यात १६ हजार खाटा आहेत. यापैकी ५ केंद्रे सुरू असून, या ठिकाणी ५ टक्के रुग्ण उपचार घेत आहेत.

रुग्णसंख्या वाढल्यास आवश्यकतेनुसार खाटा वाढवण्यात येणार असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण आलं असलं तरी धोका टळलेला नाही. निर्बंधात शिथिलता आणल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढते आहे. विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सुरक्षित वावराचा नियम धाब्यावर बसवला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या काहीशी वाढत असताना ऑमिक्रॉन या नव्या व्हेरियंटचा मुंबईत शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेनं यंत्रणा सज्ज ठेवली असून, रुग्णसंख्या वाढल्यास सर्व रुग्णालयांत मिळून खाटांची संख्या १ लाखापर्यंत वाढवण्याची तयारी केली आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

मुंबईतील १० केंद्रांपैकी सध्या वरळी, नेस्को, बीकेसी, भायखळा, मुलुंड ही केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत. मुंबईतील रोजची रुग्णसंख्या २५० ते ३०० दरम्यान होत आहे. १ डिसेंबरला ही संख्या १०८वर आली होती. रुग्णसंख्या वाढत असल्याने नाताळ, ३१ डिसेंबर तसेच लग्न समारंभाला वाढणारी गर्दी लक्षात घेऊन सुधारित नियमावलीही जारी केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा