Advertisement

पालिकेने उध्वस्त केला 'ति'चा संसार, भरपाईला मात्र नकार!


पालिकेने उध्वस्त केला 'ति'चा संसार, भरपाईला मात्र नकार!
SHARES

पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर करण्यात येणाऱ्या कारवाईचा फटका एका अधिकृत दुकानाला बसला आहे. 2 जून रोजी पालिकेकडून दादर दक्षिण परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. जेसीबी मशीनद्वारे ही कारवाई करताना पालिकेकडून अनधिकृत फलक काढण्यात आले. मात्र याचवेळी धनमिल नाका परिसरातील रेखा गोळे यांच्या अधिकृत दुकानाची भिंतदेखील कोसळली.विशेष म्हणजे या भिंतीचा खर्च देतो असे सांगून देखील 2 ते 3 वेळा पालिकेच्या कार्यालयात खेटा मारूनही रेखा गोळे यांच्या पदरी निराशाच पडली. रेखा गोळे या विधवा असून, त्यांच्यावर 2 मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे. रेखा गोळे कार्यालयात गेल्या असता त्यांना संबंधित व्यक्तींनी 'बांधकाम तुम्ही करून घ्या' असे सांगितले. तसेच महापालिका भरपाई देईल किंवा नाही यावर 'आजच आम्ही काही सांगू शकणार नाही' अशी उडवा उडवीची उत्तरे जी दक्षिण विभागाच्या महापालिका कार्यालयातून गोळे यांना देण्यात आली.

ऐन पावसाळ्यात महापालिकेची ही कारवाई मला महागात पडली आहे. महापालिकेने कोणतीही नोटीस न बजावता धडक कारवाई केली आणि दुकानाचा बोर्ड काढण्याच्या नादात माझ्या दुकानाची भिंत पाडली. मी विधवा असून 2 मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे. माझे पती असताना या दुकानाबाबतचे सर्व व्यवहार ते पहात होते. मला या विषयी काहीच माहीत नाही. या दुकानाच्या भाड्याशिवाय माझ्याकडे उत्पन्नाचे साधनदेखील नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात भाडे बंद झाल्यामुळे आमची खाण्याची भ्रांत झाली आहे. मला मदत न करू शकणाऱ्या, माझी दाद न घेऊ शकलेल्या, माझ्या दुकानाची भिंत पाडणाऱ्या त्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी ऐन पावसाळ्यात मी बांधकामासाठी आणि मुलांच्या फी साठी कुठून पैसे आणू हे सांगावे? मुंबई शहरात अनेक मोठ्या लोकांच्या मोठमोठ्या इमारती अनधिकृत असतात. माझा एक बोर्ड अनधिकृत आहे ते मी मान्यसुद्धा केले. पण आता माझ्या पडलेल्या दुकानाचे मी एकटी विधवा बाई काय करू? हे उत्तर मला व्यवस्थेने द्यावे. स्वतंत्र भारतात या महागाईच्या काळात गरीबाने जगूच नये ही सरकारची अपेक्षा आहे का? व्यवस्थेत माझी कुणी दखल घेणार नसेल तर मी दाद नक्की कुणाकडे मागू?

रेखा गोळे, दुकान मालक

2 जून रोजी विभागात झालेल्या तोडक कारवाईमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई आम्ही देऊ शकत नाही. कारण काम करत असताना ती भिंत चुकून पडली आहे. यावर कोणत्याही प्रकारची मदत महापालिकेकडून कोणत्याही व्यक्तीला दिली जाणार नाही.

प्रशांत सपकाळे, महापालिका सहाय्यक आयुक्त, जी दक्षिण विभाग

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा