Advertisement

आयकराचा दंड १ कोटीचा, शिक्षा केवळ ५-१० हजारांची!


आयकराचा दंड १ कोटीचा, शिक्षा केवळ ५-१० हजारांची!
SHARES

आयकराचा भरणा न केल्याबद्दल दोन वर्षांपूर्वी महापालिकेला १ कोटी १४ लाख ७४ हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. या दंडाप्रकरणी महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवर आरोपपत्र ठेवण्यात आले होते. पुढे खात्यांतर्गत झालेल्या चौकशीत हे दोन्ही अधिकारी दोषी आढळून आले आहेत. पण हे दोन्ही अधिकारी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या निवृत्ती वेतनातून फक्त दहा आणि पाच हजार रुपये कापण्याची शिक्षा करण्यात आली आहे.


निष्काळजीपणाबद्दल दोघेही दोषी

आयकर विभागाकडून कलम २०० ए, आयकर अधिनियम १९६१ अंतर्गत महापालिकेकडे मागणीपत्राद्वारे आयकराचा भरणा करण्यास सांगितले होते. परंतु, आयकराची ही रक्कम भरणा करण्यास उशीर झाल्याने महापालिकेला व्याजापोटी १ कोटी १४ लाख ७४ हजार रुपयांची दंडात्मक रक्कम भरावी लागली होती. या दंडात्मक कारवाईप्रकरणी महापालिकेने तत्कालीन व्यवस्थापक (आधार सामग्री संस्करण केंद्र) रवींद्र आचार्य आणि प्रमुख लेखापाल (कोषागार) नंदकुमार राणे यांच्यावर दोषारोप ठेवून त्यांची फेब्रुवारी २०१५ मध्ये खात्यांतर्गत चौकशी केली होती.

आचार्य यांनी आपले कर्तव्य योग्यप्रकारे पार न पाडल्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. तर राणे यांच्या देखभाली आणि नियंत्रणातील अभावामुळे आयकर विभागाने एवढ्या रकमेचे व्याज आकारले. त्यामुळे या कराचा भरणा करण्यापूर्वी व्याज माफ करण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. त्यामुळे सेवेतील निष्काळजीपणाबद्दल दोघांनाही दोषी ठरवलं होतं.


तरीही दंड इतका कमी का?

या दोघांवरील आरोप सिद्ध झाल्यामुळे आचार्य यांना या आरोपाबद्दल शिक्षा म्हणून १० हजार रुपये, तर नंदकुमार राणे यांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड १ कोटीचा असताना या दोन्ही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून निवृत्ती वेतनाच्या दाव्यातून एकरकमी वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या दोघांच्या निवृत्ती वेतनातून अनुक्रम १० आणि ५ हजार रुपयांची रक्कम कापण्यासंदर्भातचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी आला आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा