Advertisement

चिकूवाडीतील क्रीडासंकुलात रंगणार सर्वच खेळ

बोरिवली पश्चिम येथील चिकूवाडीतील मोकळ्या मैदानात क्रिकेट, फुटबॉल, वॉलिबॉल, टेनिस कोर्ट आणि सायकलिंगसह सर्वच मैदानी खेळांचा आनंद तेथील आसपासच्या मुलांना लुटता येणार आहे.

चिकूवाडीतील क्रीडासंकुलात रंगणार सर्वच खेळ
SHARES

बोरिवली पश्चिम येथील चिकूवाडीतील मोकळ्या मैदानाच्या जागेचा वापर आता सर्वच खेळांसाठी केला जाणार आहे. या मैदानात क्रिकेट, फुटबॉल, वॉलिबॉल, टेनिस कोर्ट आणि सायकलिंगसह सर्वच मैदानी खेळांचा आनंद आसपासच्या मुलांना लुटता येणार आहे. कारण येथे सर्व प्रकारच्या खेळांसाठीचे एक खुले क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.


ही मैदाने खेळासाठी होणार मोकळी

बोरिवली पश्चिम येथील भूखंड क्रमांक ३७४ ब/१२, ३७४ ब/१४, ३७४ ब/१६, ३७४ ब/२० आणि ३७४ ब/२४ यावर भव्य आधुनिक क्रीडा संकुल बांधण्याची मागणी तत्कालिन आमदारांनी २००९ मध्ये महापालिका आयुक्तांकडे केली होती. पण हे क्रीडा संकुल बांधण्यासाठी सुमारे १५० कोटींचा खर्च लागणार होता. त्यामुळे महापालिकेने हा प्रस्ताव गुंडाळून ठेवला होता. मात्र, या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम बांधण्याची मागणी स्थानिक आमदारांकडून होत आहे. मात्र प्रशासनाने स्टेडियमची उभारणी करून त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्याऐवजी तरुणांना मनसोक्त सर्व खेळांचा आनंद लुटता यावा, यासाठी ही मैदाने मोकळी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


मैदान सर्वांसाठी खुला

हा भूखंड मनोरंजन मैदानासाठी आरक्षित असून हे मैदान आता जनतेसाठी मोकळे खेळाचे मैदान म्हणून विकसित करण्यात येणार आहे. आणि सर्वांसाठी ते खुले राहिल, असं महापालिकेने स्पष्ट केलं आहे. या मोकळ्या मैदानामध्ये क्रिकेटचे मैदान, सरावासाठी सराव पिच, मैदानांभोवती जॉगिंग ट्रॅक, फुटबॉल मैदान, वॉलिबॉल कोर्ट, टेनिस कोर्ट, सायकल ट्रॅक, स्वच्छता गृह आदींचे नियोजन करून याचा आराखडा बनवण्याचं काम सुरू आहे. यासाठी निविदा मागवण्याचेही आदेश देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.


संरक्षक भिंत उभारण्याचं निम्मं काम पूर्ण

चिकूवाडीतील ५३,८८५.३५ चौरस मीटरचा हा भूखंड सीआरझेड एक आणि दोनमध्ये मोडत आहे. तसेच २०३४च्या विकास आराखड्यात या मैदानावर क्रीडा संकुल अर्थात स्पोर्ट कॉम्प्लेक्सचे आरक्षण आहे. मात्र या विकास आराखड्याला अद्यापही राज्य शासनाची परवानगी न दिल्यामुळे हा प्रकल्प पुढे राबवण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्यात येतील असे, महापालिकेने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, चिकूवाडीतील या मैदानासभोवती संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतलेले असून त्यातील निम्मे काम पूर्ण झाल्याचं उद्यान कक्षाकडून सांगण्यात येत आहे.



हेही वाचा - 

रेमंडच्या ताब्यातील भूखंड परत घ्या, सुधार समितीचे निर्देश

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा