
मुंबईतील गर्दी व्यवस्थापन आणि सेवा वितरण अधिक प्रभावी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) शहरातील प्रमुख पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सीसीटीव्ही पर्यटक पादचारी गणना (Tourist Footfall Monitoring System) प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा प्रस्ताव आणत आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका नगरसेवकाने मांडलेला हा प्रस्ताव मंजुरीसाठी बीएमसीच्या आगामी महासभेत सादर करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच इतर धार्मिक उत्सवांच्या काळात लाखो भाविक आणि पर्यटक मुंबईतील विविध स्थळांना भेट देतात. त्यामुळे वाढत्या गर्दीचे नियोजन, सुरक्षाव्यवस्था आणि नागरी सुविधांचे व्यवस्थापन हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान बनले आहे. या पार्श्वभूमीवर एआय-आधारित सीसीटीव्ही प्रणालीद्वारे पर्यटक आणि भाविकांच्या संख्येवर रिअल-टाइम नजर ठेवणे शक्य होणार आहे.
ऐतिहासिक किल्ले, लोकप्रिय समुद्रकिनारे, गजबजलेली बाजारपेठ आणि शेकडो वर्षांचा वारसा लाभलेली धार्मिक स्थळे यांमुळे मुंबई वर्षभर देश-विदेशातील लाखो पर्यटकांना आकर्षित करते. प्रस्तावित प्रणालीमुळे गर्दीचे अचूक विश्लेषण, आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद आणि नागरी सेवांचे अधिक प्रभावी नियोजन करण्यास मदत होणार असल्याचे महापालिका प्रशासनाचे मत आहे.
हेही वाचा
