Advertisement

'या' सहायक आयुक्तांना शिवसेनेच्या नगरसेवकांनीच घातला घेराव! वाचा...


'या' सहायक आयुक्तांना शिवसेनेच्या नगरसेवकांनीच घातला घेराव! वाचा...
SHARES

दहिसर (पू.) येथील मराठा कॉलनीतील रस्ते रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या एका बांधकामावर महापालिकेने कारवाई केल्याने एका कुटुंबाला बेघर व्हावं लागलं. त्यामुळे स्थानिक नगरसेवक प्रकाश कारकर आणि प्रभाग समिती अध्यक्षा शितल म्हात्रे यांच्यासह रहिवाशांनी विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांना घेराव घातला. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे बांधकाम नजरचुकीने तोडले असल्याची स्पष्ट कबुली दिली. दरम्यान, आपल्याकडून नगरसेवक आणि रहिवाशांनी दबाव टाकत हे लिहून घेतल्याचं नांदेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विभागाचे सहायक आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.


कुटुंबांनी दोन दिवस काढले रस्त्यावर

दहिसर पूर्व येथील मराठा कॉलनीतील रस्त्याच्या आड येणारं एक पत्र्याचं बांधकाम महापालिकेच्या आर उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडलं. हे बांधकाम ज्योती पेट्टी या महिलेच्या नावावर आहे. पण हे बांधकाम तोडल्यामुळे या कुटुंबाला दोन दिवस रस्त्यावर राहावे लागले. मात्र, या बांधकामाबाबतची कागदपत्र घेऊन या कुटुंबांनी स्थानिक नगरसेवक हर्षद कारकर यांची भेट घेतली. त्यानंतर प्रभाग समिती अध्यक्षा शितल म्हात्रे आणि नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांना घेराव घालून जाब विचारला.


म्हणून केली तोडक कावाई?

हे बांधकाम अधिकृत असून या कुटुंबाकडे १९९१ पासूनचे पुरावे आहेत. या कुटुंबात केवळ तीन विधवा महिला आणि लहान मुले असून त्यांचे घर तोडल्यामुळे हे कुटुंब रस्त्यावर आले होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्ते बांधकामात अडथळा येत असल्याचे कारण देत ते तोडले. पण हे बांधकाम तोडण्यापूर्वी त्या कुटुंबाकडे नोटीसनंतर कागदपत्रांची पडताळणी करून त्यांची बाजूही ऐकून घेतली. विशेष म्हणजे ज्या विकास नियोजन रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी हे बांधकाम तोडले जात आहे, तो रस्ता प्रस्तावित विकास आराखड्यात आहे. हा विकास आराखडा मंजूरही झालेला नाही. मग तो रुंदीकरण करण्याची एवढी घाई कशाला असा सवाल शितल म्हात्रे यांनी प्रशासनाला केला.


सहायक आयुक्तांच्या दालनातच ठिय्या

या मागण्यांसाठी तब्बल चार तास सहायक आयुक्तांच्या दालनातच ठिय्या आंदोलन केलं गेलं. यावेळी नांदेडकर यांनी दिलगिरी व्यक्त करत अधिकाऱ्यांच्या नजरचुकीने हे बांधकाम तोडले गेल्याचे सांगितले. त्यामुळे नांदेडकर यांच्याकडून हे लिखित स्वरुपात लिहून घेण्यात आल्याचं म्हात्रे यांनी सांगितलं. पण संध्या नांदेडकर यांनी नगरसेवकांच्या या कृतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत रस्ते रुंदीकरणाच्या चांगल्या कामात नगरसेवकांनी अशा प्रकारे अडथळा आणायला नको होता, असं म्हटलं आहे.


बांधकाम अनधिकृतच

नगरसेवक आणि रहिवाशांनी माझ्यावर दबाव टाकून हे पत्र लिहून घेतलं आहे. त्यामुळे दबावाखाली मला हे लिहून द्यावं लागलं आहे. पत्राचा मसुदा आम्ही लिहिला होता, पण तो त्यांनी अमान्य केला. आणि आपण स्वत: तो मसुदा लिहून देत मला त्यावर स्वाक्षरी करायला लावली, असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी मला धक्काबुक्की करण्यात आली, तसेच मला वरिष्ठांना आणि अन्य कुणालाही संपर्क करायला देण्यात आला नाही. त्यामुळे एक प्रकारे मला कोंडून ठेवण्यात आलं होतं, असाही आरोप नांदेडकर यांनी केला आहे. मात्र, हे बांधकाम अनधिकृतच आहे. तरीही त्यांची कागदपत्रे पुन्हा तपासली जातील आणि जर ते पात्र ठरले, तर त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे नांदेडकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, एच-पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे, एल विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्यानंतर आता आर-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर या नगरसेवकांच्या रडारवर आल्यामुळे भविष्यात सहायक आयुक्त विरुद्ध लोकप्रतिनिधी असे चित्र पहावयास मिळणार आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा