Advertisement

मुंबईतील 'या' भागात दूषित पाणी


मुंबईतील 'या' भागात दूषित पाणी
SHARES

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईत दूषित पाण्याचे प्रमाण गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत किंचित वाढले आहे. मात्र हे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी असल्याचा दावा महापालिका प्रशासनानं केला आहे. मुंबईच्या विविध भागातून गेल्या वर्षभरात घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांपैकी सरासरी ०.९ टक्के नमुने दूषित आढळून आले आहेत.

मशीद बंदर, भायखळा, वडाळा, परळ, दादर, धारावी या भागातील दूषित पाण्यात गेल्या वर्षभरात वाढ झाल्याचं आढळून आलं आहे. मुंबईकरांना पुरविल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची दरवर्षी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जल अभियंता विभाग संयुक्तपणे गुणवत्ता तपासते. दररोज २०० ते २५० आणि पावसाळ्यात ३०० ते ३५० जल नमुने प्रयोगशाळेत अणुजीवशास्त्रीय विश्लेषणासाठी पाठवले जातात.

मुंबईच्या २४ विभागांतून हे नमुने पाठवले जातात. प्रत्येक विभाग कार्यालयातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी, साहाय्यक अभियंता गळती विभाग, साहाय्यक अभियंता गुणवत्ता विभाग, साहाय्यक अभियंता जलकामे अशा विभागांतील कर्मचाऱ्यांमार्फत जलाशयातील तसेच जलवितरण प्रणालीतील पाणी नमुने गोळा करून ते दादरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात.

महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वार्षिक अहवालात दिलेल्या आकडेवारीवरून गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत २०२०-२१ मध्ये दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये वाढ झाली आहे.

गेल्या २ वर्षात सरासरी प्रमाण ०.७ टक्के  होते ते यावर्षी ०.९ टक्के  झाले आहे. मात्र काही विभागांमध्ये हे प्रमाण तीन टक्क्यांपुढे गेले आहे. मेट्रोची तसेच पर्जन्य जलवाहिन्यांच्या कामांमुळे जलवाहिन्यांना धक्का लागून पाणी दूषित होत असते.

काही विभागात दूषित पाण्याचे प्रमाण सरासरीच्या दुप्पट आहे. त्यात दादर, माहीम, धारावीचा भाग असलेला जी उत्तरमध्ये सर्वाधिक वेळा दूषित नमुने आढळले आहेत.  मशीद बंदर, गिरगाव, मुंबादेवी, ग्रँटरोड, वांद्रे पश्चिाम, वडाळा, नायगाव, मुलुंड, गोरेगाव, मानखुर्द या भागात हे प्रमाण १ ते २ टक्के आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा