Advertisement

गुड न्यूज! मुंबईतील १० टक्के पाणी कपात आजपासून रद्द

पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने हा निर्णय घेतला आहे.

गुड न्यूज!  मुंबईतील १० टक्के पाणी कपात आजपासून रद्द
SHARES

गेल्या महिन्याभरापासून मुंबईमध्ये सुरू असलेली १० टक्के पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच तलावक्षेत्रात जुलै २०२३ मध्ये पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पाणीसाठा ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. हीच परिस्थिती ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये कायम राहील असा अंदाज असल्यामुळे पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.

बुधवार, ९ ऑगस्ट २०२३ पासून पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घेतला.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात सुरुवातीला जलसाठ्याची पातळी खालावली होती. पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात १ जुलै २०२३ पासून १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणामध्ये मंगळवारी ८१.४४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

जलसाठ्यात सुधारणा झाल्यामुळे पाणी कपात रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव जल अभियंता विभागाने महानगरपालिका आयुक्तांकडे पाठवला होता. आयुक्तांनी मंगळवारी या प्रस्तावाला मंजुरी देत पाणी कपात रद्द केली.

आता पाणी कपात रद्द करण्यात आली असली तरी ऑगस्ट व सप्टेंबर २०२३ मध्ये काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास योग्य तो निर्णय घेण्यात येईल. तूर्तास तलावक्षेत्रात पुरेसा जलसाठा उपलब्ध होत असला तरी, नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे. 



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा