Advertisement

मालमत्ता कर न भरल्याने ७ विकासकांच्या साईट्स सील


मालमत्ता कर न भरल्याने ७ विकासकांच्या साईट्स सील
SHARES

मुंबई महापालिकेच्या मालमता कराचा भरणा न केल्याबद्दल मुंबईतील ७ इमारती व बांधकाम साईट्स सील करण्यात आल्या आल्या आहेत. यामध्ये नेपियन्सी रोडवरील आशियाना इमारतीचा विकासक रोहन बिल्डर, गोरेगावमधील रिलायबल बिल्डर, सन शाईन हाऊसिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर, कुर्ला येथील एचडीआयएल, नाझ सिनेमा आदींचा यांत समावेश आहे. आतापर्यंत महापालिकेने मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३ हजार ८२० कोटींचा महसूल गोळा केला आहे.


उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत

जकात रद्द झाल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणून मालमत्ता कराकडे पाहिलं जात आहे. ३१ मार्च २०१८ रोजी संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या माध्यमातून रुपये ५ हजार ४०३ कोटी रुपये एवढं उत्पन अपेक्षित आहे. यापैकी रुपये ३ हजार ८२० कोटी एवढी रक्कम मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महापालिकेकडे जमा झाली आहे. उर्वरित रक्कम थकबाकीदारांनी भरावी यासाठी महापालिकेने कडक कारवाई सुरू केली आहे.


कुणाची किती थकबाकी?

कारवाई करण्यात आलेल्या मोठ्या थकबाकीदारांमध्ये प्रामुख्याने पुढील ७ थकबाकीदारांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे रुपये ७ कोटी ९९ लाख ६१ हजार ८२ एवढी थकबाकी ही महापालिकेच्या 'डी' विभागातील लेडी लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्गावरील (नेपियन्सी मार्ग) 'आशियाना'इमारतीची (मे. रोहन बिल्डर्स) आहे. या मालमत्ता देयकावर अरदेशीर बोमजाई दुभाष असं नाव आहे. या इमारतीच्या 'कार लिफ्ट' चा दरवाजा ५ मार्च २०१८ रोजी सील करण्यात आला आहे.

याच विभागातील ग्रॅन्ट रोड स्टेशनजवळील 'नाज सिनेमा' (मे. माजदा थिएटर्स)च्या भूखंडावर रुपये ४ कोटी १३ लाख १३ हजार ७६१ एवढी थकबाकीपोटी या भूखंडाचा मुख्य दरवाजा ५ मार्च २०१८ रोजी सील करण्यात आल्याची माहिती करनिर्धारण व संकलन विभागाचे प्रमुख अधिकारी देविदास क्षीरसागर यांनी दिली आहे.


'हे' आहेत मोठे थकबाकीदार?

मोठ्या थकबाकीदारांमध्ये 'पी दक्षिण'विभागातील २ मालमत्ता धारकांचा समावेश आहे. लक्ष्मीनगर, गोरेगाव परिसरातील रिलायबल बिल्डर्सच्या मोकळ्या भूखंडावरील रुपये ४ कोटी ६० लाख ९२ हजार २० एवढ्या थकबाकीचा समावेश आहे.ही थकबाकी न भरल्यामुळे हा भूखंडाचा काही भाग ६ मार्च २०१८ रोजी सील करण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त आरे रोड परिसरातील 'सनशाईन हाऊसींग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर' यांच्यावर असलेल्या रुपये ४ कोटी ८ लाख १५ हजार १३८ एवढ्या थकबाकीपोटी या भूखंडावर प्रवेश करण्यासाठी असणारा मुख्य दरवाजा २२ फेब्रुवारी २०१८ रोजी सील करण्यात आल्याचंही क्षीरसागर यांनी सांगितलं.

महापालिकेच्या 'एल' विभाग परिसरातील 'मे. एचडीआयएल' यांच्या अखत्यारितील मोकळ्या भूखंडावर मालमत्ता कराची रुपये ४ कोटी ४१ लाख ८३ लाख ४९९ एवढी थकबाकी आहे. ही थकबाकी जमा न झाल्याने भूखंडावरील 'साईट ऑफीस' २३ फेब्रुवारी २०१८ रोजी सील करण्यात आले आहे.

तर 'एम पूर्व' विभागातील देवनार इंडस्ट्रीयल प्रीमायेस सहकारी सोसायटी लि. यांच्या अखत्यारितील मोकळ्या भूखंडावर रुपये २ कोटी १८ लाख ३३ हजार २६४ एवढ्या रकमेची मालमत्ता कर थकबाकी आहे. या थकबाकी पोटी या भूखंडावर जाण्याचे मुख्य प्रवेशद्वार ६ फेब्रुवारी २०१८ रोजी सील करण्यात आले आहे.

महापालिकेच्या 'एच पश्चिम' विभाग क्षेत्रातील खार परिसरातील १५ व्या रस्त्यावर असणाऱ्या ट्वीलाईट सोसायटीच्या मोकळ्या भूखंडावर रुपये ९० लाख ७१ हजार ७३ एवढी मालमत्ता कराची थकबाकी असून या भूखंडाचा मुख्य प्रवेश दरवाजा १ मार्च २०१८ रोजी सील करण्यात आला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा