Advertisement

मंडईच्या जागेत उरकले लग्नकार्य, 'पेनिन्सुला हॉटेल'ला महापालिकेची नोटीस


मंडईच्या जागेत उरकले लग्नकार्य, 'पेनिन्सुला हॉटेल'ला महापालिकेची नोटीस
SHARES

मंडईच्या जागेचा लग्नकार्य आणि इतर कार्यक्रमांसाठी वापर करणाऱ्या साकीनाका येथील पेनिन्सुला हॉटेलला मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील साकीनाका येथील मंडईची जागा 7 वर्षांपूर्वी महापालिकेने विकसीत करण्यासाठी 'हॉटेल पेनिन्सुला'ला भाडेतत्वावर दिली होती. परंतु मंडईच्या जागेचा विकास न करता हॉटेलने ही जागा लग्नकार्य आणि इतर कार्यक्रमांसाठी भाड्याने देत महापालिकेची फसवणूक केली. हा प्रकार निर्दशनास आल्यावर महापालिकेने 5 मे रोजी नोटीस काढून हॉटेलसोबत भाडेकरार रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई महापालिकेच्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांच्या कारकिर्दीत एप्रिल 2010 मध्ये ‘पेनिन्सुला नेक्स्ट’ या हॉटेलला बाजार विभागाने घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील साकीनाका येथे तळ अधिक एम मजल्याची मंडईची आरक्षित इमारत दहा वर्षांच्या भाडेकरारावर दिली होती. परंतु सात वर्षांमध्ये मंडईची ही जागा भाजी मंडईसाठी खुली करून देण्यात आली नाही.

या मंडईबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बाजार विभागाच्या अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केली. तेव्हा या इमारतीत मंडई सुरुच झाली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. उलट इमारतीच्या बांधकामात बरेच बदल करण्यात आले होते. तळमजला पूर्णपणे रिकामा करून अन्य रिकाम्या जागेशी जोडून त्याचा वापर हॉटेलमध्ये येण्याजाण्यासाठी केला होता.

विशेष म्हणजे या मंडईत कोणताही किरकोळ आणि भाजी विक्रीचा व्यवसाय सुरु नसून मंडईच्या इमारतीचे स्वतंत्र प्रवेशद्वारही हॉटेल व्यवस्थापनाने बंद केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी महापालिकेच्या बाजार विभागाचे सहायक आयुक्त संजय कुऱ्हाडे यांनी या पेनिन्सुला हॉटेलला नोटीस जारी करून 'एक महिन्यात नियमांची अंमलबजावणी करावी अन्यथा भाडेकरार संपुष्टात आणून जागा ताब्यात घेण्यात येईल', असे कळवले.

महापालिकेने दोन कोटी रुपयांच्या भाडेकरारावर ही जागा भाडेपट्ट्यावर दिली होती. परंतु प्रत्यक्षात भाजी मंडईऐवजी पेनिन्सुला हॉटेलसाठी इमारतीचा वापर होत असल्यामुळे नागरिकांना या मंडईचा लाभ मिळू शकला नाही.

याबाबत सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी 'आपल्याला याबाबत काही वेळापूर्वीच समजले आहे. जर नियमांचे उल्लंघन केले असेल तर ती मंडईची जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी', अशी मागणी केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा