Advertisement

के-पश्चिमचा कचरा कंत्राट मंजूर, पण वांद्रे ते सांताक्रुझचा प्रस्ताव ठेवला राखून


के-पश्चिमचा कचरा कंत्राट मंजूर, पण वांद्रे ते सांताक्रुझचा प्रस्ताव ठेवला राखून
SHARES

मुंबईतील कचरा उचलून त्यांची डम्पिंग ग्राऊंडपर्यंत नेऊन टाकण्यासाठी के-पश्चिम विभाग आणि एच-पूर्व व एच-पश्चिम या विभागासाठी नेमण्यात येणाऱ्या दोन कंत्राटाचे प्रस्ताव स्थायी समितीने रेकॉर्ड केले होते. परंतु, हे प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आल्यानंतर यापैकी एक प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीने मंजूर केला. 

के-पश्चिम भागातील कचरा उचलण्याच्या कंत्राटाला परवानगी देण्यात आली असून एच-पूर्व व एच-पश्चिम विभागातील कचरा उचलण्याच्या कंत्राटाचा प्रस्ताव मात्र राखून ठेवण्यात आला. त्यामुळे जे प्रस्ताव रेकॉर्ड केलं होतं, तेच प्रस्ताव पुन्हा समितीपुढे आणून आयुक्तांनी मंजूर करत प्रशासन हे समितीपेक्षा मोठेच असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं.


मध्यस्थीनंतर वातावरण निवळलं

मागील स्थायी समितीच्या बैठकीत के-पश्चिम विभाग आणि एच-पूर्व आणि एच-पश्चिम या अनुक्रमे गट क्रमांक १० आणि ८ साठीच्या कंत्राटाचे प्रस्ताव मंजुरीला ठेवलं होतं. परंतु, स्थायी समितीने हे प्रस्ताव रेकॉर्ड करून टाकले होते. यानंतर आयुक्तांनीही अडवणुकीची भूमिका घेत समितीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि प्रस्ताव रोखून धरण्याचा निर्धार केला. परंतु त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण निवळलं आणि रेकॉर्ड केलेले प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी समितीच्या पटलावर ठेवले.


एकच प्रस्ताव मंजूर

मागील सभेपुढे हे प्रस्ताव पटलावर ठेवले होते. परंतु, त्यावेळी ते राखून ठेवण्यात आलं होतं. पण मंगळवारी झालेल्या सभेत के-पश्चिममधील कचरा उचलून नेण्याच्या कंत्राटाचा प्रस्ताव मंजूर केला, परंतु, एच-पूर्व आणि एच-पश्चिम विभागाचा कचरा वाहून नेण्याचा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी एक प्रस्ताव मंजूर करत आणि एक राखून ठेवत पुन्हा एकदा आपला अधिकारही प्रशासनाला दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

बिल्डवेल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, आर.डी.देवरा अँड कंपनी आणि मेसर्स लँडमार्क कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त भागीदारीतील रेफ्युस केअर या कंपनीचा प्रस्ताव मंजूर केला. परंतु, एम.ई. इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि राज इन्फ्रा यांच्या संयुक्त भागीदारी असलेल्या एम.ई-राज या कंपनीचा प्रस्ताव राखून ठेवला आहे.


'हा' प्रस्ताव राखून ठेवला

  • विभाग : एच-पूर्व व एच-पश्चिम विभाग
  • कंत्राटदार : एम.ई- राज
  • कंत्राट किंमत : १६६ कोटी रुपये


हा प्रस्ताव मंजूर 

  • विभाग : के-पश्चिम विभाग
  • कंत्राटदार : रेफ्युज केअर
  • कंत्राट किंमत : ९४ कोटी रुपये
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा