Advertisement

परवानगी नसलेल्या मंडळांवर पालिकेची कारवाई

ऑनलाईन अर्ज स्वीकारुन परवानगी देण्याची मुदत संपल्यानंतर मुंबईत तब्बल २८१ गणेश मंडळांना परवानगी दिली गेली नव्हती. त्यामुळे गणेशोत्सवाच्या प्रारंभीच अनेक मंडळांच्या मंडपांवर कारवाई करण्यात आली आहे.

परवानगी नसलेल्या मंडळांवर पालिकेची कारवाई
SHARES

गणेशोत्सवाला अवघे काही तास उरले असताना मुंबईतील २८१ मंडळांच्या मंडपांना परवानगी नसल्यामुळं मंडळांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. परवानगी दिलेल्या मंडळांकडून न्यायालयाचं उल्लंघन होऊ नये यासाठी खुद्द विभागांचे सहायक आयुक्त अधिकाऱ्यांसह मंडळांना भेटी देऊन मंडपांच्या वाढीव बांधकामांवर कारवाई करत आहेत. तर अनधिकृत मंडप हटवले जात आहेत. 

मात्र, विभागांच्या सहायक आयुक्तांकडून सामजंस्याने मंडपाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी प्रत्यक्षात गणेशोत्सवासाठी महापालिकेच्यावतीने जबाबदारी सांभाळणारा समन्वयकच  नसल्यामुळे अजूनच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.


घाटकोपर, शिवडीत कारवाई

श्री गणरायांचं आगमन गुरुवारी होत असून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या अनेक मंडळांसमोर परवानगीचं विघ्न कायम आहे. ऑनलाईन अर्ज स्वीकारुन परवानगी देण्याची मुदत संपल्यानंतर मुंबईत तब्बल २८१ गणेश मंडळांना परवानगी दिली गेली नव्हती. त्यामुळे गणेशोत्सवाच्या प्रारंभीच अनेक मंडळांच्या मंडपांवर कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी घाटकोपरच्या एन विभागात ५ मंडप, मालाड पी-उत्तरमध्ये १ मंडप, शिवडी परिसरात १ मंडप, एच पश्चिम प्रभागाच्या वांद्रे पश्चिममधील विठ्ठल रखूमाई मंदिराशेजारील गणेश मंडळ, कुर्ला एल विभागात २ मंडप अशाप्रकारे मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये परवानगी नसलेल्या आणि न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन होत असलेल्या मंडपांवर कारवाई करण्यात आली.


कारवाईची भिती

 न्यायालयाच्या आदेशाचं पालन मंडळांकडून केलं जावं आणि परवानगी दिलेल्या मंडळांकडून वाढीव बांधकाम करून उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वच विभागाचे सहाय्यक आयुक्त डोळयात तेल घालून जागता पहारा देत आहे. यासाठी सहाय्यक आयुक्त हे कार्यकारी व सहाय्यक अभियंत्यांसह विभागाची पाहणी करून ज्या मंडळांकडून वाढीव बांधकाम झालं आहे, त्यांना काढायची विनंती करत आहेत. बांधकाम न काढल्यास पालिकेच्यावतीनं ते काढलं जाईल आणि न्यायालयाचं उल्लंघन केल्याबद्दल तक्रार केली जाईल, अशी भीती दाखवत आहेत. त्यामुळे बहुतांशी मंडळं स्वत:च बांधकाम काढत अाहेत.


आदेशाचं पालन बंधनकारक

सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रस्त्यांसह पदपथांवर मंडप उभारण्यास महापालिकेच्यावतीनं परवानगी दिली जाते. त्यामुळे याबाबत न्यायालयानं दिलेल्या आदेशाचं पालन करणं मंडळांना बंधनकारक असून त्याची काटेकोर अंमलबजावणी होते का याकडे महापालिकेचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे मनात नसतानाही केवळ न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन होऊ नये यासाठी गणेश मंडळांना विश्वासात घेऊन सण साजरा करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत.


आनंद वाघ्राळकर समन्वयक 

मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे समन्वयक म्हणून परिमंडळ २ चे उपायुक्त नरेंद्र बर्डे यांच्यावर गणेशोत्सवाची जबाबदारी आहे. परंतु बर्डे यांची प्रकृती बिघडल्यामुळे ही जबाबदारी उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पण वाघ्राळकर यांच्याकडून कोणताही प्रतिसाद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या समन्वय समितीला तसेच गणेश मंडळांना मिळत नाही. त्यामुळे  समन्वय साधावा तरी कुठे असा सवाल उपस्थित केला जात आहे. वाघ्राळकर यांनी प्रसिध्दी माध्यमांना माहिती देणं टाळल्यामुळे हा गोंधळ वाढलेला दिसत आहे. त्यामुळे आता सहाय्यक आयुक्तांना आपल्या विभागात शांतता राखण्यासाठी स्वत:च रस्त्यांवर फिरून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावं लागत असल्याचं समजतं.



हेही वाचा - 

नक्षलवादी कनेक्शन प्रकरण: ५ विचारवंतांना १७ सप्टेंबरपर्यंत नजरकैद

दुधात भेसळ करणारी टोळी जेरबंद; ४२९ पिशव्या जप्त





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा