Advertisement

वरळीतील एनएससीआयच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर


वरळीतील एनएससीआयच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर
SHARES

वरळीतील नॅशनल स्पोर्टस क्लबमधील अनधिकृत बांधकामावर महापालिकेने गुरुवारी बुलडोझर चढवला. या स्पोर्टस क्लबमधील मोकळया जागेमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. गुरुवारी जी-साऊथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी ते तोडले आहे. मात्र, येथील अनधिकृत जागेचा वापर हॉटेलसाठी केला जात असल्यामुळे त्यावर कारवाई करण्यात आली आहे. इथे मोठ्या प्रमाणात अग्निसुरक्षेचे उल्लंघन करण्यात आल्याचंही स्पष्ट झालं होतं. परंतु, क्लबमधील अंतर्गत अनधिकृत बांधकामावर मात्र कोणताही हातोडा चालवलेला नाही.


खेळाशिवाय जागेचा वापर भलत्याच कारणासाठी!

मुंबई महापालिकेने नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाला वर्षाला एक रुपया दराने भाडेतत्वावर जागा दिली आहे. या ठिकाणी महापालिकेने केलेल्या करारातील अटींचे उल्लंघन झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात मालमत्ता विभागाचे उपायुक्त, तसेच अतिक्रमण विभागाचे उपायुक्त यांनी संयुक्तपणे पाहणी करून येथील अनियमित बांधकाम, तसेच जागेचा होणारा गैरवापर याबाबतचा अहवाल सादर केला होता. त्यामध्ये क्लबच्या बाहेरील बाजूलाच खेळाडूंना मांसाहारी जेवण मिळावे यासाठी बनवलेल्या कँटिनचा वापर बार म्हणून केला जात होता. तसेच त्यांनी 'सिनेयुग वर्ल्डवाईड' या कंपनीला सब कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. ते याचा वापर खेळाव्यतिरिक्त कामांसाठी करत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते.


कारवाईआधी बांधकाम हटवण्याच्या सूचना

या अहवालानंतर महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या क्लबला कारवाईपूर्वी नोटीस देण्यात आली होती. यामध्ये त्यांना हे अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, त्यांनी हे बांधकाम न हटवल्यामुळे अखेर गुरुवारी ही कारवाई करण्यात आली.


आतल्या बांधकामावर कारवाईला टाळाटाळ?

क्लबच्या आतल्या बाजूस करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाविषयीही अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, गुरूवारी महापालिकेने फक्त बाहेरच्याच बांधकामावर कारवाई केली. आतल्या बांधकामाचा मंजूर आराखडा तपासूनच तिथे कारवाई केली जाईल, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पालिकेने जाणून बुजून आतली कारवाई टाळली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा