महापालिका देणार टायफॉईडची मोफत लस

  CST
  महापालिका देणार टायफॉईडची मोफत लस
  मुंबई  -  

  मुंबई महापालिका लवकरच 2 ते 5 वयोगटातल्या मुलांना मोफत टायफॉईड म्हणजेच विषमज्वराची लस देणार आहे. या मोफत लसीकरण मोहीमेमुळे 3.5 लाख बालकांना फायदा होणार आहे. महापालिकेने 2017-18 या वर्षासाठी टायफॉईडच्या लसीसाठी 1.5 कोटी रुपयांची तरतूद केली असून संपूर्ण लसीकरण मोहिमेसाठी महापालिकेला 3.5 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. ही मोफत लसीकरण मोहीम पुढील तीन ते चार महिन्यांत सुरू होणार आहे.

  महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य अधिकारी पद्मजा केसकर म्हणाल्या कि, ‘भायखळ्यातील सीपीडी कक्षात ही लस तयार करण्याचं लवकरच काम सुरू होईल. त्यानंतर पुढील तीन ते चार महिन्यांत ही लस रुग्णांना महापालिकेद्वारे उपलब्ध होतील. आरोग्य शिबिरांचे आयोजन करून आम्ही टायफॉईडची लस पोलियो, काविळ आणि क्षयरोगाच्या लसींसोबतच रुग्णांना देणार आहोत. टायफॉईडची लस म्हणजे टायफॉईडवर कायमचा उपाय नाही. त्यामुळे लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.’

  टायफॉईड ज्याला आपण विषमज्वर या नावानेही ओळखतो हा आजार ‘सालमोनेला टायफी’, या बॅक्टेरिया म्हणजेच विषाणूमुळे होतो. ज्याठिकाणी अस्वच्छता आहे, त्याठिकाणी हा विषाणू दूषित पाणी किंवा अन्नातून शरीरात पोहोचतो. टायफॉईड हा जरी बरा होणारा आजार असला तरी या आजारामुळे जीवाला देखील धोका पोहोचू शकतो. सतत ताप, डोकेदुखी, अशक्तपणा, भूक न लागणे, डायरिया ही टायफॉईडची लक्षणे आहेत.

  लस देऊनही 30 टक्के मुलांना टायफॉईड होतो. 5 ते 10 वर्षे वयोगटातल्या मुलांमध्ये टायफॉईड हा आजार आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो असंही केसकर यांनी सांगितलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.