Advertisement

मुंबईतील 574 रस्त्यांची कामे ऑक्टोबरपासून सुरू होणार

खड्डेमुक्त मुंबई हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे रस्ते काँक्रिटीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

मुंबईतील 574 रस्त्यांची कामे ऑक्टोबरपासून सुरू होणार
SHARES

खड्डेमुक्त मुंबई हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे रस्ते काँक्रिटीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत एकूण 2121 रस्त्यांची कामे हाती घेतली होती. यातील आतापर्यंत 771 रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. परंतु उर्वरितपैंकी 574 रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी अर्धवट होती, ही सर्व अर्धवट रस्त्यांची कामे ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.

पावसाळ्यापूर्वी अंशतः पूर्ण झालेल्या 156.74 किमी लांबीच्या 574 रस्त्यांचे काँक्रीटीकरण पुन्हा सुरू करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून बीएमसीला ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले आहे. राज्य सरकारने डिसेंबर 2025 पर्यंत सर्व चालू रस्ते प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश देऊन ऑक्टोबरमध्ये काम पुन्हा सुरू करण्याची योजना आखली आहे.

अर्धवट रस्त्याची कामे पूर्ण झाल्यानंतरच उर्वरित सुरू न झालेल्या कामांना सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे सध्या अर्धवट आणि हाती न घेतली कामे टप्प्याटप्प्याने हाती घेत मे 2027 पर्यंत सर्व रस्त्याची कामे सिमेंट काँक्रीटची केली जाणार आहेत.

महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा 1 आणि टप्पा 2 अंतर्गत दिनांक 31 मे 2025 अखेर एकूण 1385 रस्त्यांचे मिळून 342.74 किलोमीटर लांबीचे काँक्रीटकरण पूर्ण करण्यात आले आहे.

या अंतर्गत, 771 रस्त्यांचे एकूण 186 किलोमीटर लांबीचे काम 100 टक्के पूर्णत्वास गेले आहे. तर, 574 रस्त्यांवर चौक ते चौक अथवा अर्ध्या रुंदीपर्यंत याप्रमाणे मिळून एकूण 156.74 किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. हे सर्व रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आले आहेत.

पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच दिनांक 1 ऑक्टोबर 2025 पासून काँक्रिटीकरण कामे पुन्हा वेगाने सुरू केली जाणार आहेत. ही कामे सुरू असताना नागरिकांना असुविधा होणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले.

पहिल्या टप्प्यातील कामे मे 2026 आणि दुसऱ्या टप्प्यातील कामे मार्च ते मे 2027 पूर्वी पूर्ण केली जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मात्र, एकाच वेळेला एकाच भागातील दोन ते तीन रस्त्यांची कामे हाती घेणार नाही, जेणेकरून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल.



हेही वाचा

पुढील 5 दिवस धोक्याचे! अतिमुसळधार पावसाचा इशारा

पितृपक्षाच्या विधीनंतर बाणगंगा तलावात मृत मासे आढळले

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा