Advertisement

रखडलेल्या अमल महल ते ट्रॉम्बे जलबोगद्याच्या कामाला लवकरच सुरुवात


रखडलेल्या अमल महल ते ट्रॉम्बे जलबोगद्याच्या कामाला लवकरच सुरुवात
SHARES

चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे जलाशय आणि अमर महल ते शीव प्रतीक्षा नगर व पुढे परळमधील सदाकांत ढवण मैदानापर्यंत रखडलेल्या भुयारी जलवाहिनीच्या कामाला अखेर सुरुवात होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून या भुयारी जलवाहिनीचं काम रखडलं होतं. परंतु या जलवाहिनीच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून यासाठी दोन स्वतंत्र कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. या कामासाठी तब्बल २ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. मात्र, दोन्ही कंत्राटदारांनी वाटाघाटीनंतर २८ ते २९ टक्के दर कमी करून काम करण्याची तयारी दर्शवल्याने हे कंत्राट वादात अडकण्याची शक्यता आहे.


कुठून ते कुठं जाणार बोगदा?

पूर्व उपनगरातील गोवंडी, देवनार, चेंबूर, कुर्ला आणि शहरातील भायखळा, नागपाडा आदी भागातील पाणी पुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी अमर महल (हेगडेवार उद्यान) ते ट्रॉम्बे जलाशयापर्यंत जलबोगद्याचे काम महापालिकेच्यावतीनं हाती घेण्यात येणार आहे. एकूण ५.५३ कि.मी लांबीचा व अडीच मीटर व्यासाचा हा जमिनीपासून ११० ते १२० खोलवर बोगदा खोदाई यंत्राच्या सहाय्याने करण्यात येणार आहे.


सल्लागाराची नेमणूक

यासाठी महापालिकेने टीसीई यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. त्यांनी बनवलेल्या अंदाजानुसार मागवलेल्या निविदांमध्ये पात्र ठरलेल्या कंपनीने ३९ टक्के अधिक बोली लावली आहे. परंतु वाटाघाटीनंतर या कंपनीने ९.७२ टक्क्यांमध्ये काम करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे यासाठी पात्र ठरलेल्या पटेल कंपनीला हे काम ९०४ कोटींमध्ये दिलं जाणार आहे.


बोलीत 'ही' कंपनी सरस?

तर, हेगडेवार उद्यान (अमर महाल) ते प्रतीक्षा नगर आणि पुढे परळ सदाकांत ढवणपर्यंत जलबोगद्याचे काम हाती घेतलं जात आहे. हा जलबोगदा ९.७ कि.मी लांबीचा असून अडीच मीटर व्यासाचा आहे. यासाठी सल्लागाराने अंदाजित केलेल्या ६०४ कोटींच्या तुलनेत ३९.७३ टक्के अधिक बोली लावणारी सोमा एंटरप्रायझेस ही कंपनी पात्र ठरली. या कंपनीला ८४४ कोटींच्या खर्चाची बोली लावली असून सर्व करांसह ही रक्कम ११२५ कोटी रुपये एवढी आहे. या कंपनीनेही वाटाघाटीनंतर १०.३८ टक्क्यांमध्ये काम करण्यास तयारी दर्शवली आहे.

पटेल इंजिनीअरींग आणि सोमा एंटरप्रायझेस या दोन्ही कंपन्यांनी सल्लागारांनी जो अंदाजित खर्च निश्चित केला होता. त्यापेक्षा ३४ ते ३८ टक्के अधिकची बोली लावून कंत्राटदार पात्र ठरले आणि वाटाघाटीनंतर त्यांनी २८ ते २९ टक्के दर कमी करण्यास तयारी दर्शवली. त्यामुळे यामध्ये सल्लागार पूर्णपणे असफल ठरले असून या सल्लागारांच्या चुकीच्या अनुमानामुळे महापालिकेची लूट होत असल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे या कंत्राटाला तीव्र विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


कंत्राटाला विरोधाची शक्यता

मागील अनेक वर्षांपासून हे काम रखडलेलं असल्याने एका बाजूला हे काम पूर्ण व्हावं अशी महापालिकेची इच्छा असली तरी या कंत्राटातील अनियमितता यामुळे याला विरोध होण्याचीही शक्यता आहे. कंत्राटदारांनी जास्त बोली लावून एकप्रकारे महापालिकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता, हे वाटाघाटीनंतर कमी केलेल्या दरानंतर स्पष्ट होत आहे.



हेही वाचा-

गरज नसताना धारावीच्या लक्ष्मीबाग नाल्याचे काम, ६० लाख पाण्यात!

पावसात मॅनहोल्सचे झाकण उघडल्यास जेलची वारी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा