Advertisement

पावसात मॅनहोल्सचे झाकण उघडल्यास जेलची वारी


पावसात मॅनहोल्सचे झाकण उघडल्यास जेलची वारी
SHARES

मागील पावसाळयात एल्फिन्स्टन येथे मॅनहोल्समध्ये पडून डॉ. दिपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर मुंबईतील पावसाळी गटारांच्या तसेच मलवाहिन्यांच्या मॅनहोल्सवर जाळ्या बसवत दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे पाणी तुंबलेलं असलं तरच महापालिका कामगारांना हे मॅनहोल्सचं झाकण उघडयाची परवानगी दिली आहे. मात्र, महापालिकेच्या कामगारांशिवाय अन्य कुणी व्यक्तींनी हे झाकण उघडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना थेट जेलमध्ये जावं लागणार आहे. अशाप्रकारे झाकण उघडणाऱ्यांविरोधात त्वरीत एफआयआर दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत.झाकण संशयास्पदरित्या उघडे

माटुंगा येथील पाच उद्यान अर्थात फाईव्ह गार्डन जवळ नानालाल मेहता उड्डाणपुलाखाली असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पर्जन्यजल वाहिन्या खात्याच्या जलवाहिनीवरील एका मॅनहोलचे झाकण गुरुवारी ७ जून २०१८ रोजी संशयास्पदरित्या उघडे असल्याचे आढळून आले होते. अत्यंत वजनदार असलेलं हे झाकण काही विशिष्ट हेतून किंवा सनसनाटी पसरवण्याच्यादृष्टीने उघडण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे चौकशी करण्यासाठी महापालिकेच्या 'एफ उत्तर' कार्यालयाच्या माध्यमातून पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सहायक आयुक्त केशव उबाळे यांनी दिली आहे.


एफआयआर दाखल करणार 

मुंबईत पाणी तुंबणाऱ्या सर्व भागांमधील पर्जन्य जलवाहिन्या आणि मलवाहिन्यांवरील मॅनहोल्सची विशेष काळजी घेतली जात आहे. परंतू, पाणी तुंबलं म्हणून या मॅनहोल्सला महापालिका कामगारांव्यतिरिक्त कुणालाही हात लावण्याची परवानगी नाही. तरीही कोणी रस्त्यांवरील मॅनहोल्सचं झाकण उघडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या विरोधात थेट एफआयआर दाखल केला जाणार असल्याचं महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. याबाबत माटुंगा येथे गुरुवारी मॅनहोल्सचं झाकण हटवण्याचा जो प्रयत्न झाला त्याप्रकरणीही एफआयआर दाखल करण्याच्या आदेश विभागाच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.


झाकण उघडणं कठीणच

हे झाकण वजनदार असल्यानं ते उघडणं कठीण आहे. किमान २ व्यक्तींनी विशिष्ट प्रकारचा 'आकडा' हा ठराविक पद्धतीने वापरल्यानंतर हे झाकण उघडता येते. तसेच कामाच्या आवश्यकतेनुसार केवळ महापालिका कर्मचारीच हे झाकण उघडू शकतात. मात्र कोणत्याही परिस्थितीत हे झाकण उघडताना त्याच्या जवळ इशारा देणारा फलक वा झेंडा लावणे, तसेच महापालिकेचे कर्मचारी काम होईस्तोवर तेथे उभे असणे बंधनकारक आहे.हेही वाचा -

महापौर म्हणतात : पाणी तुंबलं नाही तर साचलं

रेल्वे रुळांवर का तुंबतं पाणी? वाचा...
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा