Advertisement

रेल्वे रुळांवर का तुंबतं पाणी? वाचा...


रेल्वे रुळांवर का तुंबतं पाणी? वाचा...
SHARES

रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांची सफाई करण्यासाठी महापालिकेनं रेल्वे प्रशासनाला पैसे दिल्यानंतरही केवळ रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे रेल्वेच्या रुळांवर पाणी साचण्याच्या घटना घडत आहे. रेल्वेच्या हद्दीतील मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी महापालिकेकडून पैसे देऊनही ते त्यांची सफाई करत नाहीत. याचबरोबर रेल्वे रुळांच्या समांतर असलेल्या पेटीका नाल्यांमधील कचराही साफ केला जात नसल्यानं पाण्याच्या निचरा होत नाही. परिणामी ते पाणी रुळांपर्यंत पोहोचून रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना घडत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.


मात्र हिशोब काही मिळेना

मुंबईतील सर्व नाल्यांची सफाई ही महापालिकेचे कर्मचारी करतात. परंतु, रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांची सफाईही रेल्वेकडून करून घेतली जाते. यासाठी रेल्वेला साडेतीन ते चार कोटी रुपये नालेसफाईच्या कामांसाठी दिले जातात. परंतु, दरवर्षी रेल्वेला नालेसफाईसाठी पैसे देऊनही रेल्वेकडून या पैशांच्या खर्चाचा हिशोब महापालिकेला दिला जात नाही. तसेच हे पैसे दिल्यानंतरही अनेकदा रेल्वे रुळांवर पाणी साचून वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार दरवर्षी घडत आहे. गुरुवारी मुंबईत पडलेल्या पावसात शीव, वांद्र्यासह अनेक भागातील रेल्वे मार्ग पाण्याखाली गेले होते.


म्हणून रेल्वे वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड आणि हार्बर मार्गावरील मानखुर्द स्टेशनपर्यंत मध्य रेल्वेच्या हद्दीतील ७६ कल्व्हर्ट आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या मार्गावरही काही कल्व्हर्ट आहेत. यासर्व कल्वहर्टच्या सफाईसाठी रेल्वे महापालिकेकडून पैसे घेते. परंतु, दोन रेल्वे रुळांच्या मधून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ज्या पेटीका नाले आहे, त्या नाल्यांची सफाईच रेल्वेकडून वेळेवर केली जात नाही. त्या पेटिका नाल्यांमध्ये खडी, कचरा तसेच माती भरल्यानं पावसाच्या पाण्याचा प्रवाह रोखला जातो आणि ते पाणी तिथेज जमा होऊन रेल्वे मार्गापर्यंत पसरते. त्यामुळेच पाणी साचून रेल्वे वाहतूक विस्कळीत होत असल्याचं महापालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.


रेल्वेचा निष्काळजीपणा

रेल्वे मार्गावर जे कल्व्हर्ट आहेत, ते नाले आणि रेल्वे रुळ यामध्ये खूप अंतर आहे. नाला भरला तरी यातील पाणी रेल्वे मार्गावर पसरू शकत नाही. ज्याठिकाणी अरुंद नाले आणि सखल भागात रेल्वे मार्ग आहे, त्याठिकाणी पाणी साचण्याची भीती असते. रेल्वे मार्गावरील पाण्याचा निचरा योग्यप्रकारे झाल्यास रेल्वे रुळांवर पाणी साचलं जाणार नाही. परंतु, खुद्द रेल्वेकडून याची काळजी घेतली जात नसल्यानं बऱ्याचदा या छोटया पेटीका नाल्यांमुळे रेल्वे रुळांवर पाणी तुंबलं जातं. मात्र, रेल्वेच्या निष्काळजीपणाचं खापर मुंबई महापालिकेच्या माथी फोडून जनता मोकळी होत असते. रेल्वेने छोट्या पेटीका नाल्यांची सफाई करून प्रवाहाचा मार्ग मोकळा केल्यास रुळांवर पाणी साचण्याचं प्रमाण मोठ्याप्रमाणात कमी होईल, असंही या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा