Advertisement

गरज नसताना धारावीच्या लक्ष्मीबाग नाल्याचे काम, ६० लाख पाण्यात!


गरज नसताना धारावीच्या लक्ष्मीबाग नाल्याचे काम, ६० लाख पाण्यात!
SHARES

धारावीच्या लक्ष्मीबाग नाल्याच्या बांधकामाची गरज नसतानाही महापालिकेकडून या नाल्याच्या बांधकामासाठी कंत्राट मंजूर केले. परंतु, प्रत्यक्षात या नाल्याच्या कामामध्ये असंख्य अडचणी येत असल्याने कंत्राटदाराने हे काम करण्यास असर्थता दर्शवली. या नाल्याचे काम अर्धवट करून सोडून दिल्याने यावर केलेला सुमारे ६० लाखांचा खर्च पाण्यात गेल्याचे ताशेरे महापालिकेच्या मुख्य लेखापरिक्षकांनी ओढले आहेत.


एप्रिलमध्येच काम व्हायला हवं होतं!

महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांनी सन २०१२-१३चा अहवाल सादर केला आहे. यामध्ये त्यांनी धारावीतील लक्ष्मीबाग नाल्याच्या बांधकामाबाबत ताशेरे ओढले आहेत. धारावी येथील लक्ष्मीबाग नाल्याच्या बांधकामाचे कंत्राट 'जॅकलिन एंटरप्रायझेस' या कंपनीला ऑगस्ट २००५ मध्ये देण्यात आले होते. ३.७४ कोटींचे हे एकूण कंत्राट होते. या नाल्याचे काम एप्रिल २००७पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु या कालावधीत हे काम पूर्ण झाले नाही.


४००पैकी फक्त ७१ मीटरचंच काम झालं!

एकूण ४०० मीटर पर्जन्य जलवाहिनीच्या कामांपैकी केवळ ७१ मीटर लांबीचेच काम कंत्राटदाराने केले. पादचाऱ्यांची याठिकाणी असलेली गर्दी, तसेच जमिनीखालील युटिलिटीज अन्य जागेत हलवणे आदींमुळे कंत्राटदाराला हे काम वेळेत पूर्ण करता आले नाही. परिणामी त्यांनी हे काम बंद केले. मात्र, पुढे हे काम करण्यात न आल्यामुळे यावर केलेला ५९.३९ लाखांचा खर्च वाया गेल्याची बाब महापालिका मुख्य लेखापरीक्षकांनी निदर्शनास आणली आहे.


आधी जलवाहिनी असूनही नाल्याचं काम

या नाल्याचे बांधकाम हे धारावी विकास प्रकल्पांतर्गत राबवण्यात येणार असल्याची माहिती संबंधित खात्याच्या संचालकांना सन २००२मध्ये दिली होती. तरीही या नाल्याचे बांधकाम हाती का घेतले? असा प्रश्न मुख्य लेखापरिक्षकांनी उपस्थित केला आहे. लक्ष्मीबाग नाला येथे पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिनी अगोदरपासून अस्तित्वात आहे. त्यातून योग्य प्रकारे पाण्याचा निचराही होत आहे. असे असताना या नाल्याच्या बांधकामाची योजना आखून ५९.३९ लाख रुपये का खर्च केले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


कंत्राटदाराला दिले जास्तीचे पैसे

विशेष म्हणजे या कंत्राटदाराने ९०२.५५ घनमीटर एवढे काम केलेले असताना ते ९५२.६७ घनमीटर एवढे दर्शवण्यात आले आहे. त्यानुसार या कंत्राटदाराला कामाचे पैसे देण्यात आले आहेत. त्यामुळे ५०घनमीटरचे अधिक पैसे या कंत्राटदाराला देण्यात आल्याचे लेखापरिक्षण अहवालात म्हटले आहे.



हेही वाचा

घाटकोपरच्या वल्लभबाग नाल्यावरील अतिक्रमण जमीनदोस्त


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा