Advertisement

महाराष्ट्र नेचर पार्क 'पार्क'च राहणार- डीआरपी

'नेचर पार्क'ला धारावी पुनर्विकास प्रकल्पात कुठेही हात लावण्यात येणार नाही. इतकंच काय भविष्यात 'नेचर पार्क'मध्ये कुठल्याही प्रकारचं व्यावसायिक-निवासी बांधकाम केलं जाणार नाही, अशी माहिती डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

महाराष्ट्र नेचर पार्क 'पार्क'च राहणार- डीआरपी
SHARES

धारावी पुनर्विकास प्रकल्पा (डीआरपी)ने धारावीतील 'महाराष्ट्र नेचर पार्क'चा समावेश धारावी पुनर्विकास प्रकल्पात केला आहे. यासंबंधीचं जाहीर निवेदन ५ मार्च रोजी डीआरपीकडून प्रसिद्ध करण्यात आलं असून त्यावर सूचना-हरकती मागवण्यात आल्या आहेत. मात्र डीआरपीच्या या जाहीर निवेदनावरून सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. 'नेचर पार्क'चा समावेश डीआरपीमध्ये करण्याची गरजंच काय? असा प्रश्न उपस्थित करत सरकार 'नेचर पार्क'ची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आखत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.


आदित्य ठाकरेंची उडी

नेचर पार्कवरून सुरू झालेल्या वादात शिवसेना नेते आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही उडी घेत 'नेचर पार्क' वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. एकूणच नेचर पार्क बिल्डरांच्या घशात जाणार, 'नेचर पार्क'वर भविष्यात बांधकाम होणार यावरून गेल्या २ दिवसांपासून जो वाद सुरू आहे, त्या वादाला अखेर डीआरपीने पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.


डीआरपीचा खुलासा

'महाराष्ट्र नेचर पार्क' धारावीत येतं, अशावेळी धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवताना 'नेचर पार्क' जरी स्वतंत्र यंत्रणा असली, तरी धारावीच्या आराखड्यात त्याला समावून घेणं गरजेचं होतं. त्यामुळे धारावी विकास आराखड्यात 'नेचर पार्क' सामावून घेण्यात आलं असून 'नेचर पार्क'ला ग्रीन झोन म्हणूनच आरक्षित ठेवण्यात आलं आहे.

'नेचर पार्क'ला धारावी पुनर्विकास प्रकल्पात कुठेही हात लावण्यात येणार नाही. इतकंच काय भविष्यात 'नेचर पार्क'मध्ये कुठल्याही प्रकारचं व्यावसायिक-निवासी बांधकाम केलं जाणार नाही, अशी माहिती डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.


आरोप खोटा

'नेचर पार्क' बिल्डरांच्या घशात घालण्याचा डीआरपीचा डाव, असा जो आरोप होत आहे, तो साफ चुकीचा आणि खोटा आहे.
- एस. व्ही. आर. श्रीनिवास, मुख्य कार्यकारी अधिकारी, डीआरपी


डीआरपीत समावेश का?

वरील स्पष्टीकरण देत डीआरपीने वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला असला, तरी पर्यावरणवादी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ''नकाशात 'नेचर पार्क' च्या आरक्षित जागेवर ग्रीन झोन दाखवण्यात आला आहे. या जागेवर कोणतंही बांधकाम होणार नाही, असं डीआरपीकडून स्पष्ट केलं जात असलं, तरी 'नेचर पार्क' स्वंतत्र असताना त्याचा समावेश डीआरपीमध्ये करण्याची गरजच काय? हाच आमचा मुख्य प्रश्न आहे. यामागे नक्कीच काही तरी हेतू असणार आणि तो हेतू म्हणजे 'नेचर पार्क'ची ४१ एकरची जागा बिल्डरांच्या घशात घालणे,'' असं वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद म्हणाले.


पर्यावरणवादी ठाम

पर्यावरणावादी आनंद पेंढारकर यांनीही 'नेचर पार्क'ची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डीआरपीचा डाव असल्याचं सांगत हा डाव हाणून पाडू, असा निर्धार केला आहे. त्यामुळे डीआरपीच्या स्पष्टीकरणानंतरही हा वाद सुरूच राहणार, नव्हे चिघळणार, अशी शक्यता व्यक्त होत आहे.


आदित्यची दिशाभूल

धारावी पुनर्विकास प्रकल्पाने नेचर पार्कमध्ये कोणत्याही बांधकामाला परवानगी दिलेली नसताना आदित्य ठाकरे चुकीच्या बातमीच्या आधारे जनतेची दिशाभूल करत असल्याचं राम कदम यांनी म्हटलं.



हेही वाचा-

एमसीएचआय-क्रेडायनं उचलला परवडणाऱ्या घरांचा 'विडा', मुंबईत बांधणार अडीच लाख घरं

१० टक्के रकमेवर घराचं अॅग्रीमेंट बंधनकारक, अन्यथा बिल्डरवर कारवाई



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा