Advertisement

घाटकोपरच्या वल्लभबाग नाल्यावरील अतिक्रमण जमीनदोस्त

मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं. अतिक्रमणे हटवल्यानंतर नाला रुंदीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. त्यानुसार ९६० मीटर रुंदीच्या नाल्यापैकी एकूण २७५ मीटर रुंदीचं काम पावसाळ्याअगोदर तर उर्वरीत रंदीकरण पावसाळ्यानंतर करण्यात येईल.

घाटकोपरच्या वल्लभबाग नाल्यावरील अतिक्रमण जमीनदोस्त
SHARES

घाटकोपरमधील वल्लभबाग नाल्यावरील अतिक्रमणे हटवत मुंबई महापालिकेने या नाल्याच्या रुंदीकरणाच्या कामाची गती वाढवली आहे. महापालिकेला पावसाळ्याअगोदर या नाल्याची साफसफाई करून नाल्याची रुंदी वाढवायची आहे. जेणेकरून पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य रितीने होऊ शकेल.

मुंबई महापालिकेच्या 'एन' विभागात येणाऱ्या या नाल्यातून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्याचं रुंदीकरण होणं आवश्यक होतं. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे आणि अतिक्रमणामुळे नाल्याच्या रुंदीकरणाला अडथळा येत होता.


न्यायालयाच्या आदेशाने कारवाई

अखेर मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं. अतिक्रमणे हटवल्यानंतर नाला रुंदीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. त्यानुसार ९६० मीटर रुंदीच्या नाल्यापैकी एकूण २७५ मीटर रुंदीचं काम पावसाळ्याअगोदर तर उर्वरीत रंदीकरण पावसाळ्यानंतर करण्यात येईल.



कुठल्या परिसराला फायदा?

हे काम पूर्ण झाल्यानंतर घाटकोपर परिसरातील पंत नगर, हिंगवाला लेन, साईबाबा नगर, नायडू काॅलनी, महात्मा फुले नगर इ. परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक सुरळीतपणे होईल, अशी माहिती एन विभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी दिली.


अभ्यासात निष्कर्ष

संबंधित परिसरात पाण्याचा निचरा संथगतीने होत असल्याचं लक्षात आल्यावर महापालिकेच्या पर्जन्यजल वाहिनी खात्याने परिसरातील नाल्यांचा अभ्यास केला. त्यात सद्यस्थितीत ९६० मीटर लांब आणि सुमारे दीड ते २ मीटर रुंद नाल्याचं पात्र अरूंद असल्याचं लक्षात आलं.



अतिक्रमणामुळे अडथळे

हा नाला पुढे संजय गांधी नगरमधील लक्ष्मीबाग नाल्याला मिळतो. तिथं नाल्याचं पात्र अतिशय निमुळतं झाल्याचं निदर्शन आलं. त्यामुळे नाल्याची रुंदी वाढवून ३ मीटर करण्याचं काम महापालिकेने हाती घेतलं. परंतु नाल्यावरील ८२० बांधकामांमुळे रंदीकरणात अडथळे येत होते.


१९३ बांधकामे तोडली

सोबतच रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतल्याने हे काम रखडलं होतं. यावर २२ जानेवारी २०१८ रोजी महापालिकेच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिल्यावर प्रत्यक्ष कारवाईला सुरूवात झाली. त्यानुसार महापालिकेने आतापर्यंत १९३ बांधकामे तोडली आहेत. आतापर्यंत १६५ मीटर रुंदीकरणाचं काम पूर्ण झालं असून ११० मीटर रुंदीकरणाचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, तर पावसाळ्यानंतर ६८५ मीटर रुंदीकरणाचं काम करण्यात येईल, अशी माहिती कापसे यांनी दिली.



हेही वाचा-

मुंबईत ६१९ धोकादायक इमारती

पावसाळ्यासाठी एमएमआरसी सज्ज



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा