Advertisement

मुंबईतील नालेसफाईच्या कामाला मार्चपासूनच होणार सुरुवात


मुंबईतील नालेसफाईच्या कामाला मार्चपासूनच होणार सुरुवात
SHARES

नालेसफाईच्या अपूर्ण कामांमुळे मुंबईची तुंबई होण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत चालले अाहे. त्यामुळे अाता मोठ्या व छोट्या नाल्यांची सफाई १ एप्रिलपासूनच हाती घेतली जाणार अाहे. मुंबईतील मोठे तसेच तसेच छोट्या नाल्यांसह आता रस्त्यांलगतच्या छोट्या पेटिका नाल्यांच्या साफसफाईकडे महापालिकेने विशेष लक्ष वेधले असून यंदा या रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई मार्चपासूनच हाती घेतली जाणार आहे. मार्चमध्ये नालेसफाईचे काम हाती घेण्याची ही पहिलीच वेळ ठरणार अाहे.


निविदा प्रक्रिया पूर्ण

मुंबईत दरवर्षी नालेसफाईच्या कामाला १५ एप्रिलपासून सुरुवात करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार असतो. त्यामुळे बऱ्याचदा निविदा प्रक्रिया आणि स्थायी समितीची मंजुरी याअभावी सफाईच्या कामाला मे महिना उजाडतो. यंदा सफाईच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मोठ्या नाल्यांच्या सफाई कामांसाठी २६, छोट्या नाल्यांच्या सफाई कामांसाठी १८ तर मिठी नदीच्या सफाई कामांसाठी ४ कंत्राट कामांसाठीची निविदा प्रक्रीया पूर्ण झाली आहे. मुंबईतील नालेसफाईच्या कामांना एरव्ही उशीर होत असला तरी यंदा नालेसफाईच्या कामांसाठी मागवण्यात येणाऱ्या निविदांची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता नालेसफाईच्या कामांचे प्रस्ताव आता फेब्रुवारी महिन्यातच स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.


४ प्रस्ताव स्थायी समितीपुढे

पूर्व उपनगरातील मोठ्या नाल्यांची कामे, पश्चिम उपनगरातील छोटे नाले, पेटिका नाले तसेच रस्त्यांलगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांतील गाळ काढणे आदींसह मिठी नदीच्या सीएसटी पूल कुर्ला ते फिल्टरपाडा व प्रेमनगर, बीकेसी ते कुर्ला सीएसटी पूल या दोन भागांमधील गाळ काढण्याचे एकूण ४ प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने त्यांचे प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला पाठवले असून उर्वरित प्रस्तावही लवकरच स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी पाठवले जाणार आहेत. यापूर्वी मोठ्या व छोट्या नाल्यांच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदारांचा कालावधी हा ३१ मार्चपर्यंत आहे. त्यामुळे हा कालावधी संपुष्टात आल्यानंतर स्थायी समितीच्या मान्यतेने कार्यादेश देऊन १ एप्रिलपासूनच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, असे पर्जन्य जलवाहिन्या खात्याचे प्रमुख विद्याधर खंडकर यांनी स्पष्ट केले.


रस्त्यांलगतच्या कामासाठी कंत्राटदार नाही

यावेळी प्रथमच पूर्व व पश्चिम उपनगरातील छोटे नाले, पेटिका नाल्यांसह रस्त्यांलगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांचा सफाई कामाचाही समावेश केला आहे. त्यामुळे स्थायी समितीची मान्यता प्राप्त होईल, त्याप्रमाणे रस्त्यांलगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांची कामे हाती घेतली जातील, असे खंडकर यांनी स्पष्ट केले. रस्त्यांलगतच्या कामांसाठी कुठलाही कंत्राटदार नियुक्त केलेला नाही. त्यामुळे ही काम मार्च महिन्यातच हाती घेऊन ३१ मेपूर्वी ती ६० टक्के पूर्ण केली जातील. त्यामुळे रस्त्यांलगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांची कामे मार्च महिन्यात तर मोठ्या व छोट्या नाल्यांची कामे १ एप्रिलपासून हाती घेतली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


कशाप्रकारे केली जाते नालेसफाई?

नालेसफाईची ६० टक्के कामे ही पावसाळ्यापूर्वी केली जातात. तर २० टक्के कामे ही पावसाळ्यादरम्यान तर उर्वरित २० टक्के कामे पावसाळ्यानंतर ६ महिन्यांच्या कालावधीत केली जातात.


नाल्यांची एकूण लांबी किलोमीटरमध्ये

मोठे नाले
२४७.८४ कि.मी
छोटे नाले
४२१.३६ कि.मी
मिठी नदी
२०.२५ कि.मी


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा