यावर्षी नागरिकांनी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली. फटाक्यांच्या आतषबाजीमध्येही लक्षणीय वाढ दिसून आली. मात्र, संध्याकाळी झालेल्या थोड्याशा पावसामुळे प्रदूषणात तात्पुरती घट झाली. तरीदेखील, ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अभ्यासानुसार, दिवाळीपूर्वीच्या तुलनेत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वायूप्रदूषणात सरासरी 11.1 टक्क्यांनी वाढ झाली. दिवाळीच्या काळात ध्वनी प्रदूषणातही सरासरी 3.2 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.
2024 च्या दिवाळीच्या तुलनेत यावर्षी वायूप्रदूषणात 7.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार, दिवाळीच्या काळात हवेतील प्रदूषणाचा स्तर 2023 मध्ये 62.6 टक्क्यांनी आणि 2024 मध्ये 33.9 टक्क्यांनी वाढला होता.
फक्त ‘ग्रीन फटाके’ वापरावेत – मनिषा प्रधानमुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी सांगितले की, पावसामुळे प्रदूषणात तात्पुरती घट झाली. पणतरी, पाऊस थांबल्यानंतर धूळकणांचे प्रमाण झपाट्याने वाढले, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यांनी प्रदूषण कमी करण्यासाठी फक्त पर्यावरणपूरक ‘ग्रीन फटाक्यांचा’ वापर करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले.
त्यांनी पुढे सांगितले की, पावसामुळे ठाण्याचा एकूण हवेचा दर्जा (Air Quality) ‘मध्यम’ श्रेणीत राहिला, परंतु लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणात 11.1 टक्क्यांची वाढ झाली.
हवेच्या गुणवत्तेचा तुलनात्मक अभ्यास
मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली उपपर्यावरण अधिकारी विद्या सावत आणि कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ ओमसत्याशीव पारळकर यांनी दिवाळी 2025 दरम्यान हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला.
या अभ्यासात दिवाळीपूर्वी (11 ऑक्टोबर 2025) आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (21 ऑक्टोबर 2025) हवेतील प्रदूषणाची तुलना करण्यात आली.
PM (Particulate Matter): 143 µg/m³
NOx: 31 µg/m³
SO₂: 13 µg/m³
AQI (Air Quality Index): 141
PM (Particulate Matter): 139 µg/m³
NOx: 30 µg/m³
SO₂: 17 µg/m³
AQI (Air Quality Index): 157
अभ्यासानुसार, यावर्षी ध्वनी प्रदूषणातही 3.2 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. 2024 मध्ये सरासरी ध्वनी पातळी 86 Lmax होती, तर यावर्षी ती 89.2 Lmax इतकी झाली.
हेही वाचा