फॅशन स्ट्रीटवरच्या फेरीवाल्यांवर मंगळवारी होणार कारवाई

  Mumbai
  फॅशन स्ट्रीटवरच्या फेरीवाल्यांवर मंगळवारी होणार कारवाई
  मुंबई  -  

  फॅशन स्ट्रीटवरील परवानाधारक फेरीवाल्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे तेथील 49 फेरीवाल्यांचे परवाने महापालिकेच्या ए विभाग कार्यालयाने रद्द केले आहेत. परवाने रद्द करण्यात आल्यानंतर या सर्व फेरीवाल्यांना सोमवारी नोटीस जारी करून 24 तासांमध्ये जागा खाली करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु त्यांनी आपले स्टॉल्स काढून जागा खाली न केल्यास त्यांच्यावर मंगळवारी कडक कारवाई करण्यात येणार आहे. परवाना रद्द केलेल्या सर्व फेरीवाल्यांचे स्टॉल्स आणि सामान जप्त करून ते हटवण्यात येणार असल्याचे ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले आहे.

  मुंबईतील फॅशन स्ट्रीट येथील परवानाधारक फेरीवाल्यांकडून नियमांचे उल्लंघन करून कपडे तसेच अन्य विक्रीचे साहित्य बाहेर लटकवून अतिक्रमण केले जात होते. याबाबत महापालिकेने वारंवार समजही दिली. याठिकाणी एकूण 394 परवानाधारक फेरीवाले आहेत. या सर्वांकडून पदपथ दोन्ही बाजूंनी अडवून अतिक्रमण केले जात असल्यामुळे महापालिकेच्या ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी या सर्वांना नोटीस बजावून आखून दिलेल्या एक बाय एक मीटरच्या क्षेत्रातच आपण व्यवसाय करावा, अशी सूचना केली होती. परंतु वर्षभरानंतरही फेरीवाल्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा घडून आली नाही. त्यामुळे अखेर सर्व फेरीवाल्यांचे स्थळ निरीक्षण करून अहवाल बनवण्यात आला. यामध्ये 49 फेरीवाल्यांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची बाब समोर आली. त्यामुळे या 49 फेरीवाल्यांचे परवाने त्वरीत रद्द करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार त्यांचे परवाने रद्द करण्यात आले असून सोमवारी या सर्वांना नोटीस जारी करून 24 तासांच्या आत आपले बाकडे आणि सामान हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी पोलीस संरक्षणात या सर्वांना नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. मंगळवारी सर्व फेरीवाल्यांनी जागा रिकाम्या न केल्यास त्या सर्वांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे दिघावकर यांनी स्पष्ट केले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.