Advertisement

कचरा डेब्रिज घोटाळा: २ कंत्राटदारांना 'कारणे दाखवा' नोटीस


कचरा डेब्रिज घोटाळा: २ कंत्राटदारांना 'कारणे दाखवा' नोटीस
SHARES

डेब्रिज भेसळप्रकरणी कंत्राटदारावर 'एफआयआर' दाखल करण्यासाठी मुंबई महापालिकेने केलेली तक्रार मागे करण्याची मागणी होत असतानाच आता या प्रकरणातील २ कंत्राटदारांवर ठपका ठेवून तुम्हाला काळ्या यादीत का टाकू नये, अशाप्रकारची कारणे दाखवा नोटीस महापालिका बजावणार आहे. कचऱ्यातील डेब्रिज भेसळ प्रकरणात २ कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव खात्याच्यावतीने आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. त्यावर आयुक्तांनी स्वाक्षरी केली असून त्यानुसार ही नोटीस बजावण्यात येणार असल्याचे समजते.


काय आहे प्रकरण?

मुंबईत निर्माण होणारा कचरा उचलून देवनार, कांजूरमार्ग तसेच मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यासाठी ५ वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले आहे. या कामाची पाहणी केली असता, गाड्यांमधील कचऱ्यात डेब्रिज आढळून आले होते. त्यामुळे याप्रकरणी ५ कंत्राट कंपन्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली होती.


कंत्राटदारांचा सहभाग नाही

परंतु या कामांमध्ये कंत्राटदारांचा कोणताही दोष नसल्याचे सांगत एक तर नोटीस मागे घ्या किंवा त्यांची कंत्राटे रद्द करा, अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली होती. त्यानंतर या कंत्राटदारांनी आपली बाजू महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडेही मांडली होती. यावेळी कंत्राटदारांचा कोणताही सहभाग नसल्याची बाब समोर आली होती.


काळ्या यादीत टाकण्याची शिफारस

परंतु या डेब्रिज भेसळ प्रकरणी घनकचरा विभागाने आपला अहवाल तयार करून याप्रकरणी दोन कंपन्यांच्या गाड्यांमध्ये कचऱ्याचे कमी वजन आणि त्यातच डेब्रीज आढळून आल्यामुळे त्यांना काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केली आहे. यावर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बुधवारी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे याप्रकरणी त्यांना काळ्या यादीत टाकण्यासंदर्भात नोटीस जारी करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून समजते.


वजनापेक्षा अधिक कचरा

डेब्रिज भेसळ प्रकरणात ५ कंपन्यांवर दोष होता. यामध्ये कुर्ला एल विभाग व गोरेगाव येथील पी-दक्षिण येथील डि. कॉन डू ईट(जेव्ही) यासह दोन कंपन्यांचा समावेश असल्याचे समजते. कंत्राटदारांना फेऱ्यांवर गाडीचे पैसे दिले जाते. परंतु या फेऱ्या निश्चित करताना त्यामध्ये गाडीतील कचऱ्याचे वजन निश्चित केलेले होते. त्यामुळे ज्या गाड्यांमध्ये निश्चित केलेल्या वजनापेक्षा अधिक कचरा आढळून आला, त्यांना यामध्ये निर्दोष ठरवण्यात आले आहे, तर निश्चित केलेल्या वजनापेक्षा कमी कचरा तसेच डेब्रिज आढळून आल्यामुळेच या दोन कंपन्यांवर ठपका ठेवून त्यांना काळ्या यादीत टाकण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.



हेही वाचा-

कचरा डेब्रिज भेसळ घोटाळा महापालिका अधिकाऱ्यांच्याच अंगलट


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा