Advertisement

कचरा डेब्रीज भेसळ घोटाळा महापालिका अधिकाऱ्यांच्याच अंगलट

हाताखालच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना दिलेल्या माहितीनुसार हा अहवाल बनवण्यात आला. या डेब्रिज प्रकरणात कंत्राटदारांचा कोणताही सहभाग नसून महापालिकेचेच कामगार कचरा भरत असल्याची बाब समोर आल्यामुळे याप्रकरणी चौकशी अहवाल बनवणाऱ्या उपायुक्तांवरच कारवाईचा फास आवळला जात आहे.

कचरा डेब्रीज भेसळ घोटाळा महापालिका अधिकाऱ्यांच्याच अंगलट
SHARES

मुंबईतील कचरा उचलताना त्याचं वजन वाढवण्यासाठी कचऱ्यात डेब्रिज मिसळलं जात असल्याचा अहवाल तयार करण्यात आला होता. याबरोबरच महापालिकेने सर्व कंत्राटदारांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. पण आता हे प्रकरणच महापालिका अधिकाऱ्यांच्या अंगलट येऊ लागलं असून हाताखालच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना दिलेल्या माहितीनुसार हा अहवाल बनवण्यात आला. या डेब्रिज प्रकरणात कंत्राटदारांचा कोणताही सहभाग नसून महापालिकेचेच कामगार कचरा भरत असल्याची बाब समोर आल्यामुळे याप्रकरणी चौकशी अहवाल बनवणाऱ्या उपायुक्तांवरच कारवाईचा फास आवळला जात आहे.


म्हणून डेब्रिजची भेसळ

मुंबईतील ओल्या आणि सुक्या कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी दिलेल्या कंत्राटातील अटी व शर्तींनुसार कचऱ्यामध्ये राडा-रोडा किंवा गाळ (डेब्रिज) असायला नको. मात्र, काही महिन्यांपूर्वी केलेल्या अचानक तपासणीच्या दरम्यान २४ घटनांमध्ये कचऱ्यात डेब्रिजची भेसळ केली जात असल्याचं उघड झालं होतं. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगर) विजय सिंघल यांच्या आदेशानुसार व्हिडिओग्राफीसह करण्यात आलेल्या अचानक तपासणीदरम्यान कचऱ्याचं वजन वाढवण्यासाठी कचऱ्यात डेब्रिजची भेसळ होत असल्याचं निदर्शनास आलं होतं.


अजूनही एफआरआय दाखल नाही

त्यानंतर या गैरव्यवहाराबाबत घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त विजय बालमावर यांनी संबंधित ७ कंत्राटदारांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना केल्या होत्या. मात्र, तक्रारी केल्या, तरी प्रत्यक्षात पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावणे पाठवूनही महापालिकेचे अधिकारी जात नाहीत. त्यामुळे कंत्राटदारांना नोटिसा जारी केल्या असल्या, तरी त्यांच्याविरोधात अद्यापही एफआयआर दाखल केलेले नाहीत.


'हे आम्ही केलं नाही'

कचरा उचलून डम्पिंग ग्राऊंडमध्ये विल्हेवाट लावण्यासाठी ज्या ९ गटांमध्ये कंत्राट दिले होते, त्या सर्व गटांच्या कंत्राटदारांनी या डेब्रिज घोटाळा प्रकरणात आपला काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. पण या प्रकरणी अधिकारी काही ऐकून घेत नसल्यामुळे त्यांनी थेट महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली कैफियत मांडली. यामध्ये कचरा कंत्राटदारांनी, कचरा वाहून नेण्यासाठी वाहने आणि इंधन आम्ही पुरवतो आणि कचरा गाडीत टाकण्याचं काम हे महापालिकेचे कर्मचारी करत असतात. त्यामुळे या डेब्रिज प्रकरणात आमचा संबंध जोडलाच कसा जाऊ शकतो, असं सांगितलं. यावर आयुक्तांनीही सर्वांसमक्ष खातरजमा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी हा कचरा महापालिकेचेच कामगार भरत असल्याचं सांगितलं.


ही माहिती लपवली

कंत्राटदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या भेसळ प्रकरणाची चौकशी करणाऱ्यांवरच कारवाईचे संकेत दिले आहेत. महापालिकेच्या चौकशी अहवालात प्रत्येक गाडीत एक ते दोन गोण्या डेब्रिज मिसळले गेल्याचं म्हटलं आहे. मात्र, चौकशी अधिकाऱ्यांना व्हिडिओसह या डेब्रिज भरलेल्या गोण्यांचे पुरावे देताना कचरा भरण्याचे काम महापालिकेचे कामगार करत असल्याची माहिती लपवण्यात आली आहे. त्यामुळे हा तपासणी अहवाल तयार करणाऱ्या उपायुक्तांवरच कारवाईची शक्यता आहे.


महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

डेब्रिज भेसळ प्रकरणामुळे या सर्व कंत्राटदारांना नोटीस पाठवण्यात आली होती. पण याच कंत्राटदारांना पुढील सात वर्षांचे कंत्राट देण्यात आले आहे. पण नोटीस दिल्यामुळे यांना हे काम देता येत नाही, तसेच विद्यमान कंत्राटदार म्हणून नवीन कंत्राटदारांची निवड होईपर्यंत मुदतवाढही देता येत नाही. त्यामुळे ही नोटीस मागे घेताना महापालिकेकडून चुकीचा आणि खोटा अहवाल तयार केल्याप्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शक्यता असून लवकरच याबाबतचे आदेश आयुक्तांच्या कार्यालयाकडून येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा