Advertisement

कचऱ्यात डेब्रिज भेसळ करणारे कंत्राटदार निर्दोष?

कचऱ्यातील डेब्रिज भेसळ प्रकरणी विद्यमान कंत्राटदारांविरोधात ना एफआयआर दाखल केला जाणार ना त्यांना काळ्या यादीत टाकले जाणार! महापालिका आयुक्तांनीच या सर्व कंत्राटदारांशी गुरुवारी चर्चा करून त्यांची बाजू ऐकून घेत त्यांच्यावरील कारवाईची टांगती तलवार दूर करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पाच मुख्य कंत्राट कंपन्यांना निर्दोष ठरवले जाण्याची दाट शक्यता आहे.

कचऱ्यात डेब्रिज भेसळ करणारे कंत्राटदार निर्दोष?
SHARES

कचऱ्यातील डेब्रिजमध्ये भेसळ प्रकरणात दोषी असलेल्या कंत्राटदारांविरोधात एफआयआर दाखल करायला निघालेल्या महापालिकेने आता आपली चूक मान्य केली आहे. त्यामुळे कचऱ्यातील डेब्रिज भेसळ प्रकरणी विद्यमान कंत्राटदारांविरोधात ना एफआयआर दाखल केला जाणार ना त्यांना काळ्या यादीत टाकले जाणार! महापालिका आयुक्तांनीच या सर्व कंत्राटदारांशी गुरुवारी चर्चा करून त्यांची बाजू ऐकून घेत त्यांच्यावरील कारवाईची टांगती तलवार दूर करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पाच मुख्य कंत्राट कंपन्यांना निर्दोष ठरवले जाण्याची दाट शक्यता आहे.


प्रकरणात अडकवल्यामुळे कंत्राटदार नाराज

कचऱ्यातील डेब्रिज भेसळ प्रकरणात कचरा कंत्राटदारांना महापालिकेने नोटीस बजावून स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये एफआयआर नोंदवण्यासाठी तक्रारी दाखल केल्या आहेत. परंतु, प्रत्येक कचरा गाडीत एक ते दोन गोणी डेब्रिज सापडल्यामुळे कंत्राटदारांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यामुळे कंत्राट कालावधी संपुष्टात आल्यानंतरही विद्यमान कंत्राटदारांना मुदतवाढ दिली आहे. मात्र, कचऱ्यातील डेब्रिज भेसळ प्रकरणात नाहकपणे गोवले गेल्यामुळे या सर्व कंत्राटदारांनी येत्या २७ जानेवारीपर्यंत नोटीस मागे न घेतल्यास कचरा उचलला जाणार नाही, असा इशारा दिला होता.


कचरा उचलणारे कर्मचारी पालिकेचेच!

कंत्राटदारांनी दिलेल्या या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या दालनात सर्व कचरा कंत्राटदारांची बैठक शुक्रवारी दुपारी चार वाजता पार पडली. या बैठकीमध्ये सर्व कंत्राटदारांचे म्हणणे अजोय मेहता यांनी ऐकून घेतले. यावेळी कंत्राटदारांनी, आपण केवळ वाहन व इंधन पुरवत असून कचरा भरणारे कर्मचारी हे महापालिकेचेच असतात. त्यामुळे या प्रकरणात आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगितले.


विद्यमान कंत्राटदारांनाच मुदतवाढ

यावर खुद्द महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या सर्व कंत्राटदारांना 'काम चालू ठेवा', अशा सूचना दिल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. कचरा उचलण्याच्या नवीन कामासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरु असून यासाठी अजून काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व कंत्राटदारांना पुढील सहा महिन्यांकरता कंत्राट कालावधी वाढवून देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

यापूर्वी दोन वेळा मुदत कालावधी वाढवून देण्यासंदर्भातील निवेदन स्थायी समितीत फेटाळण्यात आले आहे. त्यामुळे पुढील स्थायी समितीच्या बैठकीत हे निवेदन मंजूर करून या सर्व कंत्राटदारांना पुढील सहा महिन्यांकरता कालावधी वाढवून दिला जाणार असल्याचेही सूत्रांकडून समजते.


काळ्या यादीतील कंत्राटदाराला नाकारला प्रवेश

सर्व कचरा कंत्राटदारांबाबत महापालिका आयुक्तांनी बैठक आयोजित केलेली असताना कविराज या काळ्या यादीतील कंपनीची भागीदार तसेच शेअर होल्डर असलेल्या ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीच्या जैन बंधूंना अजोय मेहता यांनी प्रवेश नाकारला. त्यामुळे कंत्राटदार आयुक्तांशी चर्चा करत असताना जैन बंधू त्यांच्या दालनाबाहेर बसून होते.



हेही वाचा

महापालिकेला साडेचार लाखात पडलं कचरा विल्हेवाटीचं आवाहन!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा