Advertisement

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनासाठी शिवसेनेने पसरले महापालिकेकडे हात


बाळासाहेबांच्या स्मृतीदिनासाठी शिवसेनेने पसरले महापालिकेकडे हात
SHARES

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्क येथील कार्यक्रमासाठी होणारा खर्च आता शिवसेनेला पेलवेनासा झाला आहे. त्यामुळे आता या कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी चक्क महापालिकेपुढे हात पसरले आहेत. स्मृतीदिनासाठी चक्क महापालिकेच्या तिजोरीत हात घालून अर्थसंकल्पात तरतूद नसतानाही ५० लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेपुढे मदतीची भिक मागताना बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची, 'मोठी' मने गेली कुठे? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.


कार्यक्रमाची जबाबदारी शिवसेनेकडे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पाचवा स्मृतीदिन येत्या १७ नोव्हेंबरला होत आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येत असतात. दरवर्षी स्मृतीस्थळाच्या ठिकाणी होणाऱ्या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी शिवसेनेकडे असते आणि त्यासाठी होणारा खर्चही शिवसेनाच करते परंतु यंदा हा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून करण्यात येणार आहे.


'अशी' केली सूचना

मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासमवेत संयुक्त सभा बोलावून या कार्यक्रमासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची सूचना केली. त्याला महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मान्यता दिली. हा खर्च महापौर किंवा आयुक्तांच्या निधीतून केला जाईल, अशी माहिती सभागृहनेते यशवंत जाधव यांनी दिली. अशाप्रकारे महापालिका पहिल्यांदाच स्मृतीस्थळाच्याठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमासाठी खर्च करणार असल्याचं जाधव यांनी स्पष्ट केलं.


चैत्यभूमीच्या धर्तीवर

शिवाजी पार्क तसेच चैत्यभूमीवर ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात दलित बांधव येतात. या सर्वांना महापालिका सेवा-सुविधा पुरवते. याच धर्तीवर शिवसेनेने महापालिकेचा निधी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.


करदात्यांच्या पैशांवर?

कोणतंही पक्कं बांधकाम न करता उद्यान स्वरूपात बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ बनवण्यात आलं असून याठिकाणी महापालिकेचा निधी वापरून करदात्यांच्या पैशांवर स्मृतीदिन साजरा करायला शिवसेना निघाली आहे.


बैठकीत शिवसेनेचे नेते

गणेशोत्सव असो किंवा ६ डिसेंबर रोजी होणारा चैत्यभूमीवरील स्मृतीदिन महापौरांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन आणि समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली जाते. परंतु सोमवारी महापौरांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील कार्यक्रमासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी यांची बैठक बोलावून त्यात हा निर्णय घेतला.


नवा पायंडा

स्मृतीस्थळाची वास्तू एका राजकीय पक्षाशी निगडीत असल्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी कोणतीही सभा घेण्याचे अधिकार महापौरांना नसताना बेकायदा बैठक घेऊन महापौरांनी एकप्रकारे नवा पायंडाच पाडला आहे. त्यामुळे भविष्यात राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या स्मृतीदिनालाही अशाप्रकारे कार्यक्रमाचा भार महापालिकेला उचलावा लागू शकेल, अशी भीती वर्तवली जात आहे.हेही वाचा-

'जेव्हीएलआर मेट्रो स्थानकाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटर नाव द्या'

बाळासाहेब ठाकरे स्मारक विधेयक एकमताने मंजूरसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा