Advertisement

रुग्णांना औषधांपासून वंचित ठेवणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर होणार कारवाई


रुग्णांना औषधांपासून वंचित ठेवणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
SHARES

मुंबई महापालिका रुग्णालयातील रुग्णांना मोफत औषधांच्या खरेदीसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येत असली, तरी प्रत्यक्षात ही औषधेच वेळेत मिळत नसल्याचे आता खुद्द प्रशासनानेच कबूल केले आहे. महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांमुळे रुग्णांना वेळेत औषधे मिळत नसल्याचे पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे रुग्णांना औषधे उपलब्ध करून देणाऱ्या जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी बुधवारच्या सभेत दिले.


१० महिने विलंबाने औषध खरेदीचा प्रस्ताव

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह विशेष रुग्णालये, प्रसुतीगृह, आरोग्य केंद्र आणि दवाखान्यांसाठी औषधे खरेदी केली जातात. महापालिकेच्या अनुसूचीवरील ही सर्व औषधे रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे याबाबतच्या औषधांच्या खरेदीचे तीन प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला आले होते. परंतु, हे प्रस्ताव तब्बल ९ ते १० महिन्यांनी स्थायी समितीपुढे आणले गेले असून, अत्यावश्यक बाब म्हणून औषधांची खरेदी केली जात असताना एवढा विलंब का केला गेला? असा सवाल स्थायी समितीच्या सदस्यांनी उपस्थित केला. त्यामुळे रुग्णांना मोफत औषधे मिळत नसून डॉक्टर त्यांच्या हाती चिठ्ठी ठेवत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना नाईलाजाने बाहेरुन विकत आणून औषधे द्यावी लागत असल्याबाबत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी जर ही खरेदी आता केली जात आहे, तर आतापर्यंत रुग्णांना कोणती औषधे दिली जात आहेत? असा सवाल केला. कोट्यवधींची औषधे खरेदी करायची आणि रुग्णांना याचा लाभच मिळत नाही. त्यांना बाहेरून औषध आणावे लागते, असे सांगत विभागाच्या वतीने महापालिकेने खरेदी केलेली औषधे बाहेर विकली जात असल्याचा आरोप केला.


भरीव तरतूद करूनही रुग्णांच्या हाती औषधांच्या चिठ्ठ्या!

जर औषधांची गरज आहे, तर मग विलंब का केला? असा सवाल करत भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी रुग्णांना देवाच्या भरवशावर सोडले जात असल्याचे सांगितले. ही केवळ प्रशासकीय दिरंगाई असल्याचा आरोप त्यांनी केला. आरोग्यासाठी भरीव तरतूद करूनही सेवा वेळेत मिळत नाही. त्यामुळे लोकांचे हाल होत असल्याचे सभागृहनेते यशवंत जाधव यांनी सांगत 'ज्यांच्यामुळे या औषध खरेदीला विलंब झाला, त्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करा' अशी मागणी केली. यावेळी सपाचे गटनेते रईस शेख यांनी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराने औषधे देण्यास असमर्थता दर्शवली, तर त्याबाबत महापालिकेचे धोरण काय? याबाबतची विचारणा केली.


विलंब होतोय हे मान्य...

महापालिकेच्या वतीने १२ अनुसूचीवरील औषधांची खरेदी करून मोफत औषधांचा पुरवठा रुग्णांना केला जातो. या खरेदीत विलंब झाला हे खरे असल्याची कबुली अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी दिली. मात्र, यापुढे विलंब होणार नाही, याची हमी त्यांनी दिली. यापुढे मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत ही औषधांची खरेदी केली जाईल. केईएम, शीव व नायर या तीन रुग्णालयांच्या वतीने प्रत्येकी चार अनुसूचीच्या औषधांची खरेदी केली जाते. त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे त्यांनी सांगितले.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा