महापालिका कर्मचाऱ्यांना अखेर १४,५०० रुपयांचं सानुग्रह अनुदान

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी गटनेत्यांच्या तीन बैठका निष्फळ ठरल्यानंतर अखेर बुधवारी महापौरांनी गटनेत्यांची सभा न बोलवता थेट सानुग्रह अनुदानाची घोषणा करून टाकली. त्यानुसार कर्मचाऱ्यांना १४,५०० रुपयांचं सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांना अखेर १४,५०० रुपयांचं सानुग्रह अनुदान
SHARES

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अखेर १४, ५०० सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यासंदर्भातील औपचारीक घोषणा बुधवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली.

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षांच्या तुलनेत ५०० रुपयांनी वाढ करून देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु ११४ अनुदानित माध्यमिक शाळांचे शिक्षक, बेस्ट कर्मचारी, सर्व शिक्षा अभियानाचे कर्मचारी आदींना बोनस देण्याची मागणी शनिवारच्या बैठकीत महापौरांनी रेटून धरल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचा बोनसचा निर्णय लांबणीवर पडला होता. अखेर महापालिका आयुक्तांनी घेतलेला निर्णय जाहीर करून महापौरांनी बेस्टसह कंत्राटी कामगार, माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या सानुग्रह अनुदानाचा निर्णय लवकरच घेऊन, असं स्पष्ट केलं.


थेट घोषणा

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी गटनेत्यांच्या तीन बैठका निष्फळ ठरल्यानंतर अखेर बुधवारी महापौरांनी गटनेत्यांची सभा न बोलवता थेट सानुग्रह अनुदानाची घोषणा करून टाकली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ४० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी महापालिकेतील ४० कामगार संघटनांच्या समन्वय समितीने केली होती. मात्र प्रत्यक्षात मागील वर्षी देण्यात आलेल्या १४ हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानात ५०० रुपयांची वाढ करून यंदा १४ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे आयुक्तांनी ठरवले.


'या' कर्मचाऱ्यांनाही लाभ

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुदानित खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना ७ हजार २५० रुपये, आरोग्य सेविकांना ४ हजार २०० रुपये, महापालिका प्राथमिक शाळांमधील शिक्षण सेवक ४ हजार ५०० रुपये, अनुदानित खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षण सेवक यांना २ हजार २५० रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करत दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला.


महापौरांवरील नामुष्की

महापौरांनी ज्या निर्णयासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानासाठी वंचित ठेवले होते, त्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान काही मिळालेच नाही. त्या कर्मचाऱ्यांशिवायच महापौरांना सानुग्रह अनुदान जाहीर करावे लागले. महापौरांसाठी ही सर्वांत मोठी नामुष्की असून महापालिका आयुक्तांकडून सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळवून देण्यात ते असमर्थ ठरले आहेत. या सानुग्रह अनुदानासाठी महापालिकेच्या तिजोरीवर १६० कोटी रुपयांचा भार पडणार आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय