सानुग्रह अनुदानासाठी कामगार संघटनांची लाचारी, तिसऱ्या बैठकीतही निर्णय नाहीच

सानुग्रह अनुदानासाठी महापालिकेतील कामगार संघटना आणि त्यांचे नेते लाचार झालेले असताना सत्ताधारी शिवसेनेचे महापौरही या प्रश्नी हतबल झालेत. त्यामुळे नाराज कर्मचाऱ्यांनी दिवाळी भेट द्यायची असेल सन्मानाने द्या, पण भीक नको, अशीच संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे.

SHARE

मुंबई महापालिकेच्या कामगार संघटनांशी कोणतीही चर्चा न करता तसेच त्यांना तिष्ठत ठेवत सानुग्रह अनुदानाचा निर्णय प्रलंबित ठेवण्याचा प्रकार महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. सानुग्रह अनुदानासाठी महापालिकेतील कामगार संघटना आणि त्यांचे नेते लाचार झालेले असताना सत्ताधारी शिवसेनेचे महापौरही या प्रश्नी हतबल झालेत. त्यामुळे नाराज कर्मचाऱ्यांनी दिवाळी भेट द्यायची असेल सन्मानाने द्या, पण भीक नको, अशीच संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे.


४० हजार रुपयांची मागणी

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीत सानुग्रह अनुदान देण्याच्या मागणीवर शनिवार, सोमवार आणि मंगळवारीही कोणताच निर्णय होऊ शकला नाही. महापालिकेतील म्युनिसिपल मजदूर युनियन, महापालिका कामगार सेना, महापालिका इंजिनिअर्स असोसिएशन यासह ४० कामगार संघटनांनी एकत्र येत महापालिका कामगार कर्मचारी समन्वय समिती स्थापन केली असून ही समिती कर्मचाऱ्यांना ४० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी करत आहे.


प्रशासनाकडून एकदाही भेट नाही

या ४० कामगार संघटनांचे नेते व पदाधिकारी दररोज महापालिकेत येऊन प्रशासनाशी चर्चेचा प्रयत्न करत असूनही अद्याप त्यांच्याशी एकाही अधिकाऱ्यांनी चर्चा केलेली नाही. गटनेत्यांच्या सभेनंतर महापौरांशी चर्चा करून हे नेते निघून जात आहेत. त्यामुळे सलग तीन दिवस कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानासाठी हे कामगार नेते लाचारासारखे हात पुढे करून फिरत असून तिसऱ्या बैठकीतही काहीही निर्णय न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.


अनुदान हक्काचे पण,

सानुग्रह अनुदान हक्काचे आहे. पण ते भीक दिल्याप्रमाणे दिले जात असेल तर असली भीक नको आणि कामगार संघटनांनीही प्रशासनापुढे लाचार होऊन फिरु नये, असा सूर आता कर्मचाऱ्यांनी आळवायला सुरुवात केली आहे.


नेत्यांची गैरहजेरी

शनिवारी झालेल्या बैठकीत भाजपाचे मनोज कोटक, सपाचे रईस शेख, राष्ट्रवादीच्या राखी जाधव, मनसेचे दिलीप लांडे उपस्थित नव्हते. परंतु सोमवारच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या राखी जाधव, सपाचे रईस शेख आले. परंतु कोटक आणि दिलीप लांडे गैरहजर होते.

तर, मंगळवारच्या सभेला सर्वच पक्षांचे गटनेते उपस्थित होते. परंतु महापालिका आयुक्तांनी सानुग्रह अनुदानाऐवजी मुख्यमंत्र्यांना वेळ देणे पसंत केले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मनोज कोटक यांच्यासह सर्वच गटनेते त्यांची वाट पाहून निघून गेले. त्यामुळे अखेर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सानुग्रह अनुदानाचा निर्णय पुढील बैठकीत घेतला जाईल, असे जाहीर करून टाकले.

बुधवारी ११ ऑक्टोबरला भांडुप पोटनिवडणूक असल्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर आणि भाजपाचे गटनेते मनोज कोटक हे येवू शकणार नाही. त्यामुळे ही सभा आता पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, बेस्टच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास महापालिका आयुक्त तयार नाहीत. तरीही बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी महापौरांना, पुन्हा पत्र देऊन बेस्ट कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय