Advertisement

सानुग्रह अनुदानाला टाळाटाळ, महापौरांसोबतची बैठकही निष्फळ


सानुग्रह अनुदानाला टाळाटाळ, महापौरांसोबतची बैठकही निष्फळ
SHARES

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा (बोनस) प्रश्न पुन्हा एकदा लांबणीवर पडला. सोमवारी तब्बल २ तास महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांसमवेत आयुक्त आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत कोणताही निर्णय झाल्याने पुन्हा एकदा हा निर्णय मंगळवापर्यंत ढकलण्यात आला.

शनिवारच्या बैठकीत गैरहजर असलेले भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांच्यामुळेच पुन्हा एकदा बोनसवर निर्णय झालेला नाही. मात्र, कर्मचाऱ्यांना बोनस मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगत पुन्हा एकदा कामगार संघटनांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न झाला.


दुसरी बैठकही निष्फळ

मुंबई महापालिकेतील कामगार आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत शनिवारी झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे सोमवारी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी दुपारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची बैठक पार पडली. या गटनेत्यांच्या बैठकीत भाजपाचे मनोज कोटक आणि मनसेचे गटनेते दिलीप लांडे वगळता सर्वच गटनेते उपस्थित होते. तर प्रशासनाच्यावतीने महापालिका आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त उपस्थित होते.


कामगार नेते गेले मुकाट निघून

गटनेत्यांच्या या बैठकीत शनिवारप्रमाणेच पुन्हा एकदा सानुग्रह अनुदानाची चर्चा निष्फळ ठरली. दोन तासांच्या बैठकीनंतरही याबाबतचा कोणताही ठोस निर्णय न घेता महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि सर्व अतिरिक्त आयुक्त निघून गेले. महापालिकेच्या ४० कामगार संघटनांच्या समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना सोमवारी बोलवण्यात आले होते. परंतु त्यांच्यासोबत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे शनिवारप्रमाणे महापौरांनी त्यांना बोलावून कोणताही निर्णय न झाल्याची कल्पना दिली आणि कामगार नेतेही मान हलवत निघून गेले.


शिक्षकांच्या मुद्द्यावर निर्णयाला विलंब

४९ माध्यमिक शाळांचे शिक्षक, ११४ विनाअनुदानित माध्यमिक शाळांचे शिक्षक, बेस्ट, क्षयरोग कर्मचारी, सर्व शिक्षा अभियानातील कर्मचारी तसेच महापालिका कर्मचारी आदींच्या विषयावर सानुग्रह अनुदानासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली. प्रशासन यासर्व कर्मचाऱ्यांना आपले कर्मचारी मानत नाहीत, त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी कोण हे निश्चित करून सानुग्रह अनुदानाचा निर्णय घेतला जात आहे. परंतु अजूनही सानुग्रह अनुदानाचा अंतिम निर्णय झालेला नाही. याबाबतचा निर्णय मंगळवारी गटनेत्यांच्या सभेत घेतला जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. महापौर हे शिक्षक असल्यामुळे त्यांनी शिक्षकांना बोनस देण्याची मागणी केल्यामुळे याच मुद्दयावरून बोनसचा गुंता वाढल्याचे समजते.


जीएसटी, नोटबंदीमुळे आर्थिक संकट

जीएसटी, नोटाबंदी आदींमुळे आर्थिक चणचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव रक्कम देता येणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. जीएसटीची रक्कम महापालिकेला देण्यासाठी राज्य सरकारने इस्क्रो खाते उघडून त्याद्वारे देण्याचे सांगितले आहे. परंतु अद्यापही हे खाते उघडले नसून भविष्यात आर्थिक चणचण निर्माण होऊ शकते, अशी भीती प्रशासनाकडून व्यक्त होत असल्याचे महापौरांनी सांगितले.


बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाही

बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास महापालिका तयार नसल्याचेही महापौरांनी सांगितले आहे. बेस्ट उपक्रम तोट्यात असून त्यांना यावर्षी ही रक्कम देता येणार नाही, असे आयुक्तांनी म्हटले आहे. बेस्ट समिती अध्यक्षांनी, महापौरांना पत्र लिहून बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली होती.


कोटक, मामा लांडे पुन्हा एकदा अनुपस्थित

कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाच्या प्रश्नावर गटनेत्यांची सभा आयोजित केलेली असताना भाजपाचे गटनेते मनोज कोटक सलग दुसऱ्यांदा गैरहजर राहिले. त्यांच्यासोबत मनसेचे दिलीप लांडेही या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे दोन गटनेते नसल्यामुळेच आयुक्तांनी जाणीवपूर्वक यावर निर्णय घेण्यास टाळाटाळ केली असून सत्ताधारी शिवसेनेचे सर्व सदस्य असतानाही त्यांना दुसऱ्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा निर्णय घेता आलेला नाही.


चक्क महापालिका चिटणीसांना काढले बाहेर

महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांमध्ये महापालिका चिटणीस हेही सदस्य आहेत. परंतु सोमवारी गटनेत्यांच्या सभेतून चक्क महापालिका चिटणीस प्रकाश जेकटे आणि त्यांच्या व महापौरांच्या सर्व कर्मचाऱ्यांनाच बाहेर काढण्यात आले. नियमानुसार महापालिका चिटणीस हे सदस्य असतानाही महापालिका आयुक्त हे चिटणीसांना या सभेचे सदस्य मानत नसून त्यांना बाहेर काढताना खुद्द महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि सर्वच गटनेत्यांनी कोणीही याला विरोध केला नाही. त्यामुळे चिटणीसांना बाहेर काढून केलेली बैठकीला नियमानुसार कोणतेही महत्व राहत नाही, असे म्हटले जात आहे.



हेही वाचा -

डबेवालेही घेणार 'दिवाळी ब्रेक'


 

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा