Advertisement

बसथांब्यावर मृत्यू पावलेल्या 'त्या' मुलाला अखेर ३ वर्षांनी न्याय

मुंबई उच्च न्यायालयानं त्या मुलाच्या कुटुंबीयांना दिलासा दिला आहे.

बसथांब्यावर मृत्यू पावलेल्या 'त्या' मुलाला अखेर ३ वर्षांनी न्याय
SHARES

मुंबईतील वरळी सी-फेस (Worli Sea-Face) परिसरातील बेस्ट बसथांब्यावर (Best Bus Stop) ३ वर्षांपूर्वी मित्रांसोबत खेळताना एका १५ वर्षांच्या मुलाचा विजेचा धक्का (Electric Shock) लागून मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी बेस्ट (BEST) प्रशासनावर प्रचंड टीका केली होती. तसंच, नुकसानभरपाई न भेटत असल्यानं नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयानं त्या मुलाच्या कुटुंबीयांना दिलासा दिला आहे. मुलाच्या मृत्यूप्रकरणी 'बेस्ट' आणि कंत्राटदाराला (Contractor) उच्च न्यायालयानं तडाखा दिला आहे. या मुलाच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं (Bombay High Court) 'बेस्ट' आणि कंत्राटदाराला दिले आहे.

मुंबई उच्च न्यायालयात राजेंद्र बामणे यांनी याचिका (Petition) दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावाला यांच्या खंडपीठानं निर्णय देताना 'बेस्ट' (BEST) आणि कंत्राटदाराला नुकसानभरपाईचे आदेश दिले.

बामणे यांचा १५ वर्षांचा मुलगा प्रतीक हा शारदाश्रम शाळेत दहावीत शिकत होता. परंतु, मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर 'बेस्ट' आणि कंत्राटदारानं आर्थिक मदतीस (Financial Help) नकार दिल्यानं बामणे यांनी उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली होती. तसंच, 'बेस्ट' आणि कंत्राटदार कंपनीला नुकसानभरपाई म्हणून १० लाख रुपये देण्याचं, तसंच यापुढे अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.

या प्रकरणात नुकसानभरपाई देण्यापासून हात झटणाऱ्या ‘बेस्ट’ प्रशासनालाही न्यायालयानं नुकसानभरपाईचे आदेश देताना प्रामुख्यानं धारेवर धरलं. महसूल मिळवण्यासाठी बसथांब्यांवर (Bus Stop) जाहिराती आणि फलक लावण्यास परवानगी देण्याचा करार 'बेस्ट'नं कंत्राटदाराशी केला होता. त्यामुळं थांब्यांच्या देखभालीची, लोकांच्या जिवाला कुठलाही धोका पोहोचणार नाही याची जबाबदारी कंत्राटदारासह ‘बेस्ट’चीही असल्याचं यावेळी न्यायालयानं सुनावलं.

नेमकी घटना काय?

३० मे २०१७ रोजी प्रतीक हा आपल्या मित्रांसोबत संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास बसथांब्याजवळ खेळत होता. त्यावेळी समुद्रात भरतीची वेळ असून, समुद्राच्या लाटा बसथांब्यावर आदळत होत्या. त्याचवेळी खेळत असताना प्रतीकने बस थांब्याला स्पर्श केला आणि त्याला विजेचा धक्का बसला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृत्यू विजेचा धक्का लागल्यामुळं झाल्याचं निष्पन्न झालं.

खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या बामणे यांच्या पत्नीचाही २०१५ मध्ये मृत्यू झाला होता. त्यामुळं २ मुलांसह ते राहत होते. परंतु प्रतीकच्या दुर्दैवी मृत्यूनंतर 'बेस्ट' वा कंत्राटदारानं एक वर्षांनंतर २५ हजार रुपये देण्याव्यतिरिक्ति बामणे यांना आर्थिक साहाय्य केलेलं नाही. या प्रकरणी प्रतीकचे कुटुंबीय नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे, असं न्यायालयानं आदेशात नमूद केलं.

बसथांब्यावर कंत्राटदारानं जाहिरातीचे फलक लावले होते. त्यामुळं बामणे कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी ही आपली नव्हे, तर कंत्राटदाराची असल्याचा दावा 'बेस्ट'नं केला होता. हा दावा न्यायालयानं फेटाळला. ‘बेस्ट’ आणि कंत्राटदारामध्ये झालेल्या कराराबाबत सर्वसामान्य जनतेचा काडीमात्र संबंध नाही, असं न्यायालयानं नमूद केलं. तसेच ‘बेस्ट’ आणि कंत्राटदाराला अनुक्रमे ५ व १० लाख रुपये बामणे यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले.हेही वाचा -

हार्बर मार्गावर एप्रिलपासून लागू होणार नवं वेळापत्रक?

मुंबईच्या कमाल तापमानात मोठी वाढसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा