Advertisement

उजव्या बाजूला हृदय असणाऱ्या संकेतवर यशस्वी शस्त्रक्रिया


उजव्या बाजूला हृदय असणाऱ्या संकेतवर यशस्वी शस्त्रक्रिया
SHARES

जन्मापासून उजव्या बाजूला हृदय असलेल्या औरंगाबाद इथल्या 6 वर्षांच्या लहानग्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान देण्यात मुंबईतील डॉक्टरांना यश आले आहे. मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन या रुग्णालयात संकेत मोरे या मुलावर ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. आता संकेतची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

जन्मानंतर संकेत सतत आजारी पडत होता. सतत ताप येऊन अंग निळसर पडत होते. म्हणून त्याच्या आईवडिलांनी त्याला आधी औरंगाबादच्या स्थानिक डॉक्टरांना दाखवले. तरिही त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती. त्यानंतर त्याला पुण्यातील बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. पंकज सुगावकर यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले. त्यांनी केलेल्या तपासणीत संकेतचे हृदय उजव्या बाजूला असल्याचे त्यांना समजले. तसेच हृदयात छेदही असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी मुंबईला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर एप्रिल 2017 ला मोरे कुटुंबीय संकेतला घेऊन सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात आले. वैद्यकीय तपासणीनंतर संकेतच्या हृदयाची दोन झडपे आणि रक्तवाहिन्या एकमेकांमध्ये गुंतल्याचे आढळले. याला वैद्यकीय भाषेत 'कॅारोनरी आर्टरी' असे म्हणतात. तसेच संकेतचे हृदय उजव्या बाजूला असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे खूपच कठीण होते. पण डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारत त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.

डॉक्टरांनी सर्वप्रथम हृदयाला स्वच्छ रक्तपुरवठा व्हावा याकरता टनल तयार केले. त्यानंतर आकुंचन पावलेल्या रक्तवाहिन्या मोठ्या करून त्या हृदयाला जोडण्यात आल्याचे रुग्णालयातील बाल हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. शिवप्रकाश कृष्णन नाईक यांनी सांगितले.

संकेतच्या हृदयात छेद असल्याने त्याच्या हृदयाची कार्यक्षमता मंदावली होती. हा छेद भरण्यासाठी ओपन हार्ट शस्त्रक्रिया करावी लागते. पण, हृदयाची झडपे खोलून शस्त्रक्रिया करताना हृदय पूर्णतः बंद करावे लागते. त्याकरता बायपास मशीनचा वापर केला जातो. अशात इलेक्ट्रीकल सर्किट व्हायची भिती अधिक असते. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करणे खूपच कठीण असते. पण ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. पुढचे काही दिवस त्याला रक्तदाबाचे औषध सुरु राहील. आता संकेत आहार घेत असून थोड्याफार प्रमाणात तो फिरत देखील आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.
- डॉ. श्रीपाल जैन, बाल हृदयरोग तज्ज्ञ

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा