Advertisement

घोडबंदर मार्गावर १० ऑगस्टपर्यंत वाहतूकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावर १० ऑगस्टपर्यंत वाहतूक बदल लागू केले आहेत.

घोडबंदर मार्गावर १० ऑगस्टपर्यंत वाहतूकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
SHARES

घाटकोपर- ठाणे या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम सध्या ठाणे शहरात सुरू आहे. या कामाचा भाग म्हणून घोडबंदर येथील ओवळा सिग्नल ते सीएनजी पंप पर्यंत मार्गिकेवर तुळई (गर्डर) टाकण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावर १० ऑगस्टपर्यंत वाहतूक बदल लागू केले आहेत.

दररोज रात्री ११.५५ ते पहाटे ४ पर्यंत हे बदल लागू असतील अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. या भागातील हलक्या वाहनांची वाहतूकही सेवा मार्गावरून वळविण्यात आली आहे.

घाटकोपर ते ठाणे या मेट्रो चार प्रकल्पाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरू आहे. घोडबंदर मार्गावर काही ठिकाणी मेट्रोच्या खांबांवर तुळई ठेवण्यात येत आहे.

त्यानुसार, पुढील काही दिवस ओ‌वळा सिग्नल ते सीएनजी पंपापर्यंतच्या भागातही खांबांवर तुळई ठेवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी या मार्गिकेवर वाहतूक बदल लागू केले आहेत. उरण जेएनपीटीहून सुटणारी अवड वाहने गुजरात, वसईच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी घोडबंदर मार्गाचा वापर करत असतात. परंतु येथे वाहतूक बदल लागू केल्याने आता अवजड वाहनांची वाहतूक भिवंडी मार्गे वळविण्यात आली आहे.

ठाणे शहरात अवजड वाहनांना रात्री ११ ते पहाटे पाच आणि दुपारी १२ ते ४ पर्यंत परवानगी आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत उरण जेएनपीटीहीहून घोडबंदर मार्गे गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाका मार्गे किंवा कशेळी काल्हेर मार्गे वळविण्यात आली आहे.

घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांची वाहतूक तुळई उभारण्याच्या ठिकाणी सेवा रस्त्यावरून वळविण्यात आली आहे.

असे आहेत वाहतूक बदल

अवजड वाहनांसाठी

  • मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या कापूरबावडी जंक्शन भागात प्रवेशबंदी आहे. येथील वाहनांना खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे तर, मुंबईहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणारी अवजड वाहने कशेळी मार्गे इच्छित स्थळी जातील.
  • मुंब्रा, कळवा येथून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद आहे. येथील वाहने गॅमन मार्गे खारेगाव खाडी पूलाखालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे जातील.
  • नाशिकहून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद आहे. ही वाहने मानकोली पूलाखालून उजवे वळण घेवून अंजुरफाटा मार्गे जातील.

हलक्या वाहनांसाठी

  • हलकी वाहने ओवळा सिग्नल येथून डावीकडे वळण घेवुन सेवा रस्त्याने पुढे विहंग हिल संकुल येथून सेवा रस्ता मार्गे वाहतूक करतील.



हेही वाचा

अंधेरीच्या चित्रकूट सेटला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी

विरार ते मीरा रोड मार्गावर मेट्रोची गरज, राजेंद्र गावितांची लोकसभेत मागणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा