'महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी नागरीकांकडूनही सहकार्याची अपेक्षा'

  Dadar (w)
  'महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी नागरीकांकडूनही सहकार्याची अपेक्षा'
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
  मुंबई  -  

  सर्वांच्या एकत्रित सहभागातून आपले राज्य विकसीत आणि समृद्ध बनवूया, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने केले. महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी शिवाजी पार्क येथे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी लोकांना संबोधित करताना ते बोलत होते.

  मुंबईचे जागतिक दर्जाच्या शहरात रुपांतर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग प्रकल्पाचा विस्तार म्हणून वर्सोवा-वांद्रे सेतू मार्ग प्रकल्प उभारण्यात येत असल्याचे राज्यपाल राव म्हणाले. मुंबईत प्रवासी बोटसेवा सुरू करण्याचे ठरवले आहे. जुलै 2018 पर्यंत नेरुळ-उरण रेल्वे कॉरिडॉर कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाराष्ट्रातील अधिकाधिक शहरे निवडण्यात आलेली आहेत. मुख्य ठिकाणांच्या दळणवळण सेवेत सुधारणा करण्यासाठी राज्यात 10 विमानतळ विकसित करण्यात येत आहेत. शासनाने, नागपूर आणि मुंबई दरम्यान 46 हजार कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चाचा ‘समृध्दी कॉरिडॉर’ हा अतिद्रुतगती दळणवळण महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती देखील राज्यपालांनी यावेळी दिली.

  यावेळी राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, महिला पोलीस दल, निशाण टोळी, लोहमार्ग पोलीस दल, गृहरक्षक दल, वाहतूक पोलीस दल, राज्य परिवहन विभाग, अग्निशमन दल, महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा-रक्षक मंडळ, ब्रास बॅण्ड पथक, पाईप बॅण्ड पथक, मोटार सायकल वाहतूक पोलीस पथक यांनी संचलन केले. तसेच यावेळी मोटार परिवहन विभागाच्या रक्षक बुलेटप्रुफ व्हॅन, मार्क्समन बुलेटप्रुफ व्हॅन, महिला सुरक्षा पथक, महारक्षक बुलेटप्रुफ व्हॅन, वरुण वॉटर कॅनन यांचे तसेच अग्निशमन दलाच्या फायर इंजिन आणि हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मचे प्रदर्शन करण्यात आले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.