महापालिकेत पाण्यावरून उकाळ्या

  BMC
  महापालिकेत पाण्यावरून उकाळ्या
  मुंबई  -  

  बीएमसी - पाण्याच्या मुद्दयावरून महापालिका सभागृहात चांगलेच वातावरण तापले आहे. कपातीच्या नावाखाली मुंबईकरांना वेळेत तसेच योग्य दाबात कपात करत कमी प्रमाणात पाणी पुरवठा केला जात आहे. काही भागांमध्ये दूषित पाण्याचाच पुरवठा होत असल्याचा पाढा नगरसेवकांनी मांडला. आधीच तापमान वाढलेले असून त्यातच पाण्याच्या मुद्दयावरून नगरसेवकांचा पारा वाढल्यामुळे पाण्याला चांगल्याच उकाळ्या फुटल्या होत्या.

  महापालिका सभागृहात शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका राजुल पटेल यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत सध्या सुरू असलेली दहा टक्के पाणी कपात ही प्रत्यक्षात के/पश्चिम विभागांमध्ये साठ टक्केच असल्याचा आरोप केला. दहा टक्के पाणी कपात असली तरी प्रत्यक्षात पाण्यात आणि वेळेतही कपात केली जात आहे. त्यामुळे कमी प्रमाणात पाणी मिळत आहे. जलाशयातील पाण्याची पातळी वाढली जात नसल्यामुळे डोंगराळ भागातील लोकांना पाणी मिळत नाही. तसेच काही भागांमध्ये जुन्या जलवाहिन्यांमधून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार राजुल पटेल यांनी मांडली. यावर भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी चोवीस तास पाणी पुरवठा करण्याची योजनाच बारगळली असल्याचे सांगत मुंबईकरांना किमान पुढील पाच वर्षात तरी आपण चौवीस तास पाणी देऊ का? असा सवाल केला. मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी घाटकोपर तसेच विक्रोळीमधील डोंगराळ भागात शिवसेनेचे नगरसेवक निवडून येत आहेत. परंतु तेथील पाण्याची समस्या मिटलेली नाही. विक्रोळीतील रामजी नगरमध्ये तर दोन दिवसाआड पाणी येत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.

  मालाडमध्ये तर लोकांना पाणीच माहित नाही. त्यांना फक्त ‘मिठा पानी’ माहित आहे. दोन गॅलेन पाणी मिळवण्याचा त्यांचा सकाळपासून प्रयत्न सुरू असतो. याभागात पाण्याच्या पुरवठयासाठी जलवाहिनीच टाकलेली नाही. ज्या जलवाहिन्या टाकलेल्या आहेत, त्यासर्व माफियांच्या असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक विरेंद्र चौधरी यांनी करत विभागाच्या सहायक आयुक्तांकडूनही याची दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त केली आहे. चौवीस तास पाणी पुरवठा आणि दुषित पाणी पुरवठा या दोन विषयांवर सद्स्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत, याची दखल त्वरीत प्रशासनाने घ्यायला हवी, असे भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या अल्पा जाधव यांनीही पाण्याच्या मुद्दयावरून आवाज उठवताना पहाटे चार वाजता होणारा पाणी पुरवठ्याची वेळ पुढे ढकलावी अशी मागणी केली. तसेच 9 इंच जलवाहिनी बदलून त्या 12 इंचीच्या करण्यात याव्यात, अशी मागणी केली. सपाच्या शायना खान यांनीही गोवंडीत 40 वर्षांपासून पाण्याची समस्या जैसे थेच असल्याचे सांगितले. सकाळी उठल्यावर तेथील लोक मुलांना शाळेत पाठवण्याआधी पाण्यासाठी गॅलेन घेऊन रांगेत उभे राहण्यासाठी पाठवतात, अशी बाब मांडली. मात्र, प्रशासनाकडून पाण्याच्या मुद्दयावरून ठोस उत्तर देता न आल्यामुळे अखेर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.