आयआयटीकडून मध्य रेल्वेच्या ३ पुलांवरील पदपथ बंद करण्याची शिफारस

मध्य रेल्वेवरील करीरोड, भायखळा, आर्थर रोड येथील रोड ओव्हर पुलांवरील पदपथ धोकादायक झाले असून ते तातडीने बंद करण्याची शिफारस आयआयटीनं अहवालात केल्याची माहिती समोर येत आहे.

SHARE

मध्य रेल्वेवरील करीरोड, भायखळा, आर्थर रोड येथील रोड ओव्हर पुलांवरील पदपथ धोकादायक झाले असून ते तातडीने बंद करण्याची शिफारस आयआयटीनं अहवालात केल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान ३ जुलै २०१८ रोजी कोसळलेल्या गोखले पुलानंतर आयआयटी तज्ञांच्या नेमलेल्या समितीनं आपला अंतरिम अहवाल मध्य रेल्वेला सादर केला. या अहवालात भायखळा, करी रोड, आर्थर रोड आणि घाटकोपर उड्डाणपुलांवरील अवजड वाहतूक बंद करण्याची शिफारस आयआयटीच्या तज्ञांनी केली आहे.


पुलांची पाहणी

अंधेरी येथील गोखले पूल दुर्घटनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील पुलांची पाहणी करण्यासाठी आयआयटीसह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने पुलांचं सर्वेक्षण पूर्ण केलं. या पथकाने पाहणी केलेल्या भायखळा, आर्थर रोड, करीरोड आणि घाटकोपर पुलांचा अहवाल मध्य रेल्वेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यामध्ये करीरोड स्थानकांतील रोड ओव्हर पुलावर असलेल्या कँटिलिव्हर भागावरील बांधकामं तातडीनं हटवून हा भाग बंद करण्यात यावा, अशी शिफारस मध्य रेल्वेला करण्यात आली आहे. 


पादचारी भाग असुरक्षित

करीरोड पुलाच्या या भागाचा सद्यस्थितीत पादचाऱ्यांकडून वापर केला जात आहे. त्याचबरोबर भायखळा, आर्थर रोड आणि घाटकोपर पूलांरील देखील पादचारी भाग असुरक्षित असल्याचं आयआयटीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याशिवाय, वाहतुकीला वेगमर्यादा घालण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. घाटकोपर सोडून उर्वरित पुलांवर ताशी ३० कि.मी.च्या वेगानं गाड्या चालविण्याची सूचना करण्यात आली असून, १६ टनांपेक्षा जास्त वजनाच्या ट्रेलरवरही प्रवेश न देण्याची सूचना आयआयटी तज्ञांनी केली आहे.हेही वाचा -

शिवसेनेच्या राहुल शेवाळेंना आमदार कोळंबकरांचा पाठिंबासंबंधित विषय
ताज्या बातम्या