78 टक्के नालेसफाई पूर्ण, मुंबई महापालिकेचा दावा

  Mumbai
  78 टक्के नालेसफाई पूर्ण, मुंबई महापालिकेचा दावा
  मुंबई  -  

  मुंबईत करण्यात येत असलेल्या नालेसफाईबाबत टक्केवारीची आकडेवारी सांगत चांगल्या प्रकारे सफाई झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. यंदाही टक्केवारीची आकडेवारी मांडून मेच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत 78 टक्के सफाईचे काम पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. एवढेच नव्हे तर मागील वर्षीच्या तुलनेत हे काम जलदगतीने सुरू आहे. मागील वर्षी याच कालावधीत नालेसफाईचे काम हे 59 टक्के एवढेच झाले होते, असे दाखले देत प्रशासनाने आपली पाठ थोपटवून घेण्यास सुरुवात केली आहे.

  मुंबईतील मोठ्या नाल्यांच्या सफाईद्वारे साधारणपणे 1 लाख 77 हजार 766 मेट्रीक टन एवढा गाळ येत्या पावसाळ्यापूर्वी हटविणे अपेक्षित आहे. यापैकी 20 मे 2017 पर्यंत सुमारे 1 लाख 39 हजार 485 मेट्रीक टन गाळ काढून वाहून नेण्यात आला आहे. याचाच अर्थ 20 मे 2017 पर्यंत नालेसफाईची कामे 78.47 टक्के एवढी झाली आहेत. गेल्यावर्षी पावसाळ्यापूर्वी एकूण 1 लाख 77 हजार 818 मेट्रीक टन एवढा गाळ काढून तो वाहून न्यायचा होता. यापैकी गेल्यावर्षी 'मे'च्या तिसऱ्या आठवड्याच्या अखेरपर्यंत मोठ्या नाल्यांमधून सुमारे 1 लाख 5 हजार 403 मेट्रीक टन एवढा गाळ काढून वाहून नेण्यात आला होता. म्हणजेच गेल्यावर्षी हे प्रमाण 59.28 टक्के एवढे होते, अशी माहिती महापालिकेच्या अभियांत्रिकी सेवा आणि प्रकल्पाचे प्रभारी संचालक प्रकाश कदम यांनी दिली आहे.

  मे च्या तिसऱ्या आठवड्याच्या अखेरपर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील शहर विभागातील मोठ्या नाल्यांमधून 9 हजार 901 मेट्रीक टन (58.19 टक्के) एवढा गाळ काढून तो वाहून नेण्यात आला आहे. गेल्यावर्षी हेच प्रमाण 42.17 टक्के एवढे होते. यावर्षी पश्चिम उपनगरांमध्ये 78 हजार 178 मेट्रीक टन (78.73 टक्के); तर पूर्व उपनगरांमध्ये 51 हजार 406 मेट्रीक टन(83.65 टक्के) एवढा गाळ काढून वाहून नेण्यात आला आहे. गेल्यावर्षी हेच प्रमाण पश्चिम उपनगरांमध्ये 67.06 टक्के; तर पूर्व उपगनरांमध्ये 53.03 टक्के एवढे होते. मिठी नदीमधील गाळ काढून तो वाहून नेण्याचे काम देखील प्रगती पथावर असून, 20 मे 2017 पर्यंत 66.10 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशीही माहिती प्रकाश कदम यांनी दिली आहे.

  छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी राबतात 12 लाख 25 हजार हात

  छोट्या नाल्यांच्या आणि रस्त्या लगतच्या वाहिन्यांच्या सफाईची कामे विभाग स्तरावर केली जात आहेत. ही सर्व कामे स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने केली जात आहेत. छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी 3 लाख 70 हजार 954 मनुष्य, तर रस्त्यालगतच्या वाहिन्यांच्या सफाईसाठी 2 लाख 41 हजार 546 मनुष्यांचा वापर करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ही कामे करण्यासाठी एकूण 12 लाख 25 हजार हात नालेसफाईसाठी राबवले जाणार आहेत. तसेच ही कामे करताना गरज भासल्यास अतिरिक्त मनुष्य दिवसांची उपलब्धता स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. ही कामे देखील पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.